स्टार प्रवाह वाहिनीवर गेल्या काही दिवसांपासून एका मालिकेची मोठी चर्चा सुरू आहे. ‘कोण होतीस तू काय होतीस तू'(Kon Hotis Tu Kay Zalis Tu) ही नवीन मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मालिकेची तगडी स्टारकास्ट आणि प्रोमो यामुळे या मालिकेविषयी प्रेक्षकांची उत्सुकता वाढत आहे. विशेष बाब म्हणजे प्रेक्षकांचे लाडके ऑनस्क्रीन जोडपे हे पुन्हा एकदा या मालिकेतून परतले आहे.
“आमच्या घरात आनंदाचं वातावरण…”
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून गौरी व जयदीप घराघरांत पोहोचले. या जोडीला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. या मालिकेत गौरीची भूमिका अभिनेत्री गिरीजा प्रभूने तर जयदीपची भूमिका ही मंदार जाधवने साकारली होती. या मालिकेत वर्षा उसगांवकरदेखील प्रमुख भूमिकेत दिसल्या होत्या. २०२० ते २०२४ या काळात या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता गिरीजा प्रभू व मंदार जाधव ही ऑनस्क्रीन जोडी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे. स्टार प्रवाहच्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
आता अभिनेता मंदार जाधवचा भाऊ अभिनेता मेघन जाधवने केलेले वक्तव्य चर्चेत आहे. मेघन जाधवने नुकताच टेलीगप्पाशी संवाद साधला. यावेळी त्याला विचारण्यात आले की तुझा मोठ्या भावाची एक नवीन मालिका येत आहे, त्याबद्दल काय सांगशील? यावर बोलताना मेघन जाधव म्हणाला, “प्रोमो पाहिला आहे.खूप छान आहे. त्याचं जे काही काम असतं, ते तो छानच करतो. त्यामुळे, आम्हाला एकमेकांबद्दल लहानपणापासूनच विश्वास आहे. प्रोमो बघून खूप छान वाटलं. चांगल्या प्रकारचा शो येतोय. आमच्या घरात आनंदाचं वातावरण आहे. कारण-एक स्टार प्रवाहसाठी काम करतोय, दुसरा झी मराठीसाठी काम करतोय. प्रेक्षकांचे प्रेम आहे, त्यामुळे हे शक्य होत आहे”, असे म्हणत अभिनेत्याने मंदारच्या नवीन कामासाठी त्याला शुभेच्छा देत त्याच्यावर विश्वास असल्याचे म्हटले आहे.
मेघन जाधवबद्दलच्या कामाबाबत बोलायचे तर अभिनेता सध्या लक्ष्मी निवास मालिकेत जयंत ही भूमिका साकारत असल्याचे दिसत आहे. त्याच्या या भूमिकेला विविध छटा असल्याचे पाहायला मिळते. तो जान्हवीवर अत्यंत प्रेम करतो. मात्र, तो तितकाच विचित्रही वागतो. त्याच्या विक्षिप्त वागण्याचा जान्हवीला अनेकदा त्रास होतो. जान्हवीने फक्त त्याच्यासाठी गोष्टी कराव्यात, त्याच्याकडे लक्ष द्यावे, त्याच्यावर प्रेम करावे, असे त्याला वाटते. जेव्हा जान्हवी त्याच्यापेक्षा इतरांवर जास्त लक्ष देते किंवा त्यांच्यासाठी गोष्टी करते, ते जयंतला आवडत नाही. त्यानंतर तो विचित्र शिक्षा देताना दिसतो. त्याचे हे पात्र लोकप्रिय ठरताना दिसत आहे.