Meghan Jadhav on his Fitness Mantra: ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहे. या मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची मने जिंकून घेताना दिसतात.
घराची जबाबदारी खांद्यावर घेणारे लक्ष्मी व श्रीनिवास असो वा त्यांच्या समजूतदार मुली भावना व जान्हवी असो. कुटुंबापेक्षा स्वत:चा विचार करणारा संतोष, स्वत:च्या पायावर उभे राहण्याची धडपड करणारा; पण अयशस्वी ठरणारा हरीश किंवा बोलता न येऊनही सर्वांची मने जिंकणारा वेंकी. सासूप्रमाणेच घराचा विचार करणारी वीणा, भावानाच्या प्रेमात अखंड बुडालेला सिद्धू, आनंदीसाठी आई होणारी भावना, जान्हवीवर अतोनात प्रेम करणारा जयंत, अशी मालिकेतील सर्वच पात्रे प्रेक्षकांची लाडकी ठरली आहेत.
मेघन जाधव काय म्हणाला?
लक्ष्मी निवास या मालिकेत जयंतचे पात्र अभिनेता मेघन जाधवने साकारले आहे. आता अभिनेत्याने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याचा फिटनेस मंत्रा काय आहे, यावर वक्तव्य केले आहे. मेघन जाधव म्हणाला, “प्रामाणिकपणे सांगायचं तर विशिष्ट अशी दिनचर्या नाही. जेव्हा मला सुट्टी असते, तेव्हा मी आजही खूप उशिरा उठतो. जेव्हा मला दुसऱ्या दिवशी शूटिंग नसतं तेव्हा मी दोन-तीन वाजेपर्यंत जागा असतो. डाएटचंही इतकं काही नाही. मी जे पदार्थ असतात, ते सगळं खातो.”
“मी आयुष्याचा मंत्रा ठेवला आहे. आपल्याला कुठे ना कुठे लिमिट फॉलो करणं, खूप गरजेचं असतं. जास्त खाल्ल्यानं पोटाचा त्रास होतो. जास्त जागरणानं दुसऱ्या दिवशी तुम्ही काम करू शकत नाही. त्यामुळे कुठे थांबलं पाहिजे, हे समजलं पाहिजे. मी स्वत: अनुभवलंय की, एखादा व्यायाम जास्त वेळ केला, तर त्याचा त्रासही होतो. त्यामुळे फिटनेस मंत्रा असा काही नाही; पण घरचं जेवण हे मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. मी कधीही डाएटवर नसतो. मी घरचं जेवण खातो. कधी कधी बाहेरचंसुद्धा थोडं खातो. सेटवर नाश्ता आला, तर मी थोडं खातो. पण, मला वाटतं की, मी लिमिटमध्ये खातो. समजा आज मी तिखट खाल्लं आहे, तर दुसऱ्या दिवशी मी तिखट खाणार नाही. अशा प्रकारे मी बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो.
शूटिंगदरम्यान असा काही सीक्वेन्स लिहून आला असेल, ज्यात मी बारीक दिसलं पाहिजे. तर त्यासाठी तेवढी मेहनत असते. मग त्या काही दिवसांसाठी डाएट असतो. व्यायामामध्येदेखील बदल केला जातो. व्यायाम हा दिनचर्येचा भाग आहे.
दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेतील मेघनच्या भूमिकेला प्रेक्षकांचे प्रेम मिळताना दिसत आहे.