Lakshmi Niwas : ‘झी मराठी’ची ‘लक्ष्मी निवास’ मालिका प्रसारणाच्या पहिल्या दिवसापासूनच प्रचंड चर्चेत आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सध्या मराठी वाहिन्यांवर ही एकमेव मालिका तब्बल १ तास प्रसारित केली जाते. याशिवाय नुकताच ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत प्रेक्षकांना जयंत आणि जान्हवीचा भव्यदिव्य लग्नसोहळा सुद्धा पाहायला मिळाला होता. यामुळे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, आता लवकरच यामध्ये एक नवीन ट्विस्ट येणार आहे.
जयंत-जान्हवीचं थाटामाटात लग्न झाल्यावर ते दळवी कुटुंबीयांचा निरोप घेऊन आपल्या घरी जातात. जयंत एकटा राहत असल्याने त्याच्या घरी जान्हवीचं स्वागत करण्यासाठी कोणीच नसतं. यामुळे जयंत स्वत: औक्षण करून आपल्या पत्नीचा गृहप्रवेश करतो असं मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसापासून सर्वांना समजून घेणारा, कायम दळवी कुटुंबीयांना मदत करणारा अशी जयंतची भूमिका होती. मात्र, लग्नानंतर पहिल्याच दिवशी जान्हवीला मोठा धक्का बसणार आहे.
जान्हवीला बसणार धक्का
जान्हवी नवऱ्यासाठी दूध घेऊन खोलीत येते. यावेळी तिच्या साडीवर अचानक झुरळ चढतं. या झुरळाला पाहून ती जोरात किंचाळते. जान्हवी घाबरल्याचं पाहून जयंत काहीसा विचलित होतो आणि झुरळाला पाहून, “माझ्या जान्हवीला त्रास झाला, आता शिक्षा होणारच” असं म्हणतो. यानंतर जयंत ते झुरळ मारून त्याला दुधात टाकून ते दूध पितो. हे सगळं पाहून जान्हवी प्रचंड बिथरते. लग्नानंतर पहिल्याच दिवशी जयंतमधील ही मानसिक विकृती पाहून ती खूप घाबरून जाते. ४ आणि ५ फेब्रुवारीला हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेच्या या प्रोमोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे. काही नेटकऱ्यांनी हिंदीची कॉपी केली असल्याचं कमेंट्समध्ये म्हटलं आहे. तर, काही युजर्सनी “आधीच माहिती होतं आम्हाला जयंत सायको दाखवणार…”, “तरी म्हटलं एवढं चांगलं कसं दाखवत आहेत”, “बापरे काय ट्विस्ट आहे”, “अरे हे काय आहे”, “हा ट्रॅक दाखवण्याची गरज नव्हती, मग यांचं लग्न थाटात का केलं” अशा प्रतिक्रिया या प्रोमोवर दिल्या आहेत.