Zee Marathi Lakshmi Niwas : ‘झी मराठी’ वाहिनीवर गेल्यावर्षीच्या अखेरीस म्हणजेच २३ डिसेंबरला ‘लक्ष्मी निवास’ ही नवीन मालिका सुरू झाली. या मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. याचं मुख्य कारण म्हणजे, ‘लक्ष्मी निवास’मध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. हर्षदा खानविलकर, तुषार दळवी, अक्षया देवधर, कुणाल शुक्ला, दिव्या पुगावकर या कलाकारांनी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. अशातच आता मालिकेत आणखी एका अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
‘लक्ष्मी निवास’ मालिकेचं कथानक मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारलेलं आहे. आपलं हक्काचं घर असावं, आपल्या मुलींची थाटामाटात व चांगल्या घरात लग्न व्हावीत अशी लक्ष्मी आणि श्रीनिवास या दाम्पत्याची इच्छा असते. आता या दोघंही आपल्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने प्रवास करत आहेत. आता या दरम्यान मालिकेत मराठी कलाविश्वातील एक लोकप्रिय अभिनेत्री एन्ट्री घेणार आहे.
‘लक्ष्मी निवास’मध्ये एन्ट्री घेणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव आहे अमृता देशमुख. सिंचनाची भूमिका साकारणाऱ्या तन्वी कोलतेने अमृताच्या एन्ट्रीबाबत पहिली पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना हिंट दिली होती. तन्वीने सेटवरचा व्हिडीओ शेअर करत अमृता देशमुखचं स्वागत करण्यास अनन्याला ( मालिकेतील छोटी आनंदी ) सांगितलं होतं. या व्हिडीओमधून अमृता या मालिकेत सई ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट होत आहे. याशिवाय आता स्वत: अमृताने सुद्धा तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर फॅन पोस्ट शेअर करत ‘लक्ष्मी निवास’मध्ये एन्ट्री घेणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अमृता देशमुखने आपल्या दमदार अभिनयाने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात अमृताने जबरदस्त खेळीने प्रेक्षकांची मनं जिंकली. अमृता अभिनयाबरोबर उत्कृष्ट आरजे आहे. ‘पुण्याची टॉकरवडी’ म्हणून तिला ओळखलं जातं. काही दिवसांपूर्वी अमृताने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नव्या पर्वात एन्ट्री घेतली होती. आता हास्यजत्रेनंतर अमृता मालिकाविश्वात ‘लक्ष्मी निवास’च्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे.

आता अमृताची ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत केव्हा एन्ट्री होणार आणि ती साकारत असलेल्या सईचं पात्र नेमकं काय असेल याचा उलगडा प्रोमो आल्यावर होईल. दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ ही मालिका रोज रात्री ८ ते ९ असा एक तास प्रसारित केली जाते.