Lakshmi Niwas : ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत सध्या श्रीनिवास आणि वेंकी दोघंही लाडक्या जानूला भेटण्यासाठी जयंतच्या घरी गेल्याचा सीक्वेन्स चालू आहे. जान्हवीची मोठी बहीण मंगला अचानक जयंतच्या घरी पोहोचते. यावेळी बंगल्याचा इलेक्ट्रॉनिक दरवाजा मंगलाला हाताळता येत नाही परिणामी, जयंतच्या घरचा सायरन वाजू लागतो.
पुढे, जयंत सीसीटीव्हीमध्ये घरी मंगला आल्याचं पाहतो. सुरक्षा रक्षकांना सांगून जयंत मंगलाला एका खोलीत डांबून ठेवतो. याठिकाणाहून कशीबशी बाहेर पडून मंगला थेट माहेरी जाते. घरी आल्यावर ती काय-काय घडलं याची माहिती लक्ष्मीला देते. मंगलाचं बोलणं ऐकून सर्वांनाच धक्का बसतो. या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी श्रीनिवास जयंतच्या घरी जायचं ठरवतो. कारण, जान्हवीचा फोन सुद्धा लागत नसतो. तिचा फोन जयंतने मुद्दाम बंद करून ठेवलेला असतो.
जान्हवी एकटीच घरात अस्वस्थ होऊन बसलेली असते. घराला खिडक्या नाहीत, दिवसभर फोन नाही म्हणून ती प्रचंड कंटाळते. तिला माहेरच्यांची खूप आठवण येत असते. जान्हवी फक्त शरीराने इथे आहे तिचं मन माहेरी अडकलंय हा विचार करून जयंत बायकोची परीक्षा घ्यायचं ठरवतो. झुरळ मारून तो दुधात टाकतो आणि माझ्यावर खरंच प्रेम असेल तर हे दूध पिऊन दाखव असं म्हणत विकृत जयंत जान्हवीने झुरळ खावं यासाठी हट्ट धरतो.
जयंत जान्हवीला दूध प्यायची सक्ती करणार इतक्यात घराची बेल वाजते. सीसीटीव्ही पाहिल्यावर बाहेर जान्हवीचे वडील आणि वेंकी दादा आल्याचं जयंतच्या लक्षात येतं. तर, जान्हवी नवऱ्याच्या वागण्याने पूर्णपणे बिथरून गेलेली असते.
आता येत्या भागात जयंत जान्हवीला नवीन फोन आणून देणार आहे. पण, त्यात नेटवर्क अजिबात नसतं. यामागे जान्हवीने कोणाशीच फोनवर बोलू नये असा क्रूर हेतू जयंतचा असतो. शेवटी लाडक्या लेकीला भेटण्यासाठी लक्ष्मी, श्रीनिवास, वेंकी, जानूची आजी असे सगळे जयंतच्या घरी येणार आहेत.
आईला अनेक दिवसांनी पाहिल्यावर जान्हवीला अश्रू अनावर होतात तर, जयंतच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो. आपल्या माहेरच्या लोकांबरोबर जान्हवी एकदम आनंदाने वावरतेय हे जयंतला सहन होत नाही. बेडरुममध्ये आल्यावर तो जान्हवीला म्हणतो, “मगाशी आई-बाबांबरोबर जशी हसत होतीस तसं मला हसून दाखव.” नवऱ्याचं बोलणं ऐकून जानूला धक्का बसतो. जयंत इतका विकृत कसा काय वागतोय असा विचार ती करू लागते.
आता जयंतचं हे विकृतपणे वागणं दळवी कुटुंबासमोर येणार का? हे प्रेक्षकांना २९ मार्चला पाहायला मिळणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवर ही मालिका रोज रात्री ८ वाजता १ तास प्रसारित केली जाते.