छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी चांगलीच चढाओढ सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सायंकाळी ७ पासून घरोघरी मराठी मालिका पाहिल्या जातात. ओटीटी माध्यमांना पसंती मिळत असली तरी आजही छोट्या पडद्याचा प्रेक्षकवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अलीकडच्या काही दिवसात मराठी वाहिन्या प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी नवनवीन विषयांवर आधारित मालिका आणण्याचा प्रयत्न करत आहेत. याशिवाय काही मालिका या हिंदी मालिकांमधून रिमेक करण्यात आल्या आहेत.
‘झी मराठी’ने डिसेंबर महिन्यात ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांची घोषणा केली होती. या दोन्ही मालिकांच्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. शिवाय या मालिकांच्या प्रोमोंना प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. ‘पारु’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांच्या घोषणेनंतर ‘झी मराठी’वर आणखी दोन मालिका सुरू होणार असल्याचं समोर आलं आहे.
हेही वाचा : “प्रत्येक भारतीयाची भावना…”, राम मंदिराबाबत प्राजक्ता माळीची पोस्ट; म्हणाली, “प्राणप्रतिष्ठा…”
‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ अशी या दोन मालिकांची नावं आहेत. या दोन्ही मालिका नेमक्या किती वाजता प्रसारित केल्या जाणार याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. यातील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका हिंदीमधील ‘पुनर्विवाह’ मालिकेचा रिमेक आहे. तसेच ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या मालिकेतून रिमेक करण्यात आली आहे. अशी माहिती मराठी टीव्ही इन्फो या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आली आहे.
हेही वाचा : Video: “प्रभू श्रीराम यांच्याआधी…”, अनुपम खेर यांनी हनुमान गढी मंदिरात दर्शन घेतल्यावर केले विधान
दरम्यान, ‘पुनर्विवाह’ व ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ या दोन्ही मालिका ‘झी टीव्ही’वरील ( हिंदी वाहिनी ) लोकप्रिय आणि गाजलेल्या मालिका होत्या. त्यामुळे याच्या मराठी रिमेकमध्ये कोणाला संधी मिळणार? नव्या मालिकांमध्ये कोणते कलाकार झळकणार? तसेच ‘पुन्हा कर्तव्य आहे’ व ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकांना प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.