Star Pravah Serial : छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये विविध कलाकारांची एन्ट्री होत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं आहे. काही दिवसांपूर्वीच ‘ठरलं तर मग’ मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री क्षिती जोगची एन्ट्री झाली. यानंतर नुकतीच ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत अभिनेत्री माधुरी पवारने एन्ट्री घेतली आहे. या पाठोपाठ आता ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत आणखी एक अभिनेत्री झळकणार आहे. ती कोण आहे जाणून घेऊयात…
‘झी मराठी’ वाहिनीवर गेली वर्षभर ‘पुन्हा कर्तव्य आहे’ ही मालिका सुरू होती. या मालिकेने १५ मार्च २०२५ रोजी म्हणजेच साधारण महिन्याभरापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर आणि अक्षय म्हात्रे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते. आता ही मालिका संपल्यावर यामधली मुख्य अभिनेत्री प्रेक्षकांना नव्या रुपात भेटायला येणार आहे.
अक्षया हिंदळकरने ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. ती या मालिकेत कोणती भूमिका साकारणार, तिच्या पात्राचं नाव काय असेल? याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात…
‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘अबोली’ मालिकेत लवकरच प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया हिंदळकर झळकणार आहे. याआधी अक्षयाने ‘स्टार प्रवाह’च्या ‘साता जन्माच्या गाठी’ आणि ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’ या लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य नायिकेची भूमिका साकारली होती. जवळपास ४ वर्षांनंतर ‘अबोली’ मालिकेतून ती ‘स्टार प्रवाह’वर कमबॅक करणार आहे. सुप्रिया नागरगोजे असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून, ती पहिल्यांदाच खलनायिकेच्या रुपात झळकणार आहे.
सुप्रिया नागरगोजे ही आपल्या जुळ्या बहिणीच्या म्हणजेच पौर्णिमाच्या खुनाचा प्रतिशोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. तिला पूर्ण खात्री आहे की, पौर्णिमाचा घरगुती गॅस सिलिंडर स्फोटात झालेला मृत्यू हा अपघात नव्हे तर घातपात होता. हा सुनियोजित खून पौर्णिमाच्या सासू-सासऱ्यांनी केला आहे. परंतु, हे सिद्ध करण्यासाठी तिच्याकडे कोणताही पुरावा नाहीये अशावेळी ‘अबोली’ आपल्याला आणि आपल्या बहिणीला न्याय मिळवून देईल या अपेक्षेने सुप्रिया अबोलीकडे येते. परंतु, फटकळ आणि वाचाळ स्वभाव असलेल्या सुप्रियाच्या बोलण्यावर अबोलीचा विश्वासच बसत नाही.
सुप्रिया आपल्या बहिणीला कसा न्याय मिळवून देणार? अबोली सुप्रियाला साथ देणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. दरम्यान, ‘अबोली’ मालिका ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर रात्री ११ वाजता प्रसारित केली जाते.