Zee Marathi : छोट्या पडद्यावरील वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी जोरदार चढाओढ सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सध्या वाहिन्यांकडून नवनवीन योजना आखल्या जात आहे. मालिकेत नव्या कलाकारांची एन्ट्री, काही वर्षे लीप याशिवाय आता छोट्या पडद्यावर आणखी एक नवीन ट्रेंड सुरू झालाय तो म्हणजेच ‘मालिकांचा महासंगम’. या विशेष भागांमध्ये दोन मालिकांचं कथानक एकत्र जोडलं जातं.

‘झी मराठी’ वाहिनीवर यापूर्वी प्रेक्षकांना ‘पारू’ व ‘लक्ष्मी निवास’ मालिकेचा भव्य महासंगम पाहायला मिळाला होता. यावेळी जान्हवी-जयंतचं लग्न आणि अनुष्का-आदित्यचा साखरपुडा ठरवण्यात आला होता. आता ‘झी मराठी’ वाहिनीने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मात्र, यावेळी केवळ दोन मालिकांचा महासंगम नसून वाहिनीवर एकूण सहा मालिकांचा महासंग्राम प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर होळीच्या निमित्ताने विशेष भाग पार पडणार आहे. या महासंग्रामसाठी ‘सावळ्याची जणू सावली’, ‘लाखात एक आमचा दादा’, ‘पारू’, ‘लक्ष्मी निवास’, ‘शिवा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या सगळ्या मालिकांमधले कलाकार एकत्र जमणार आहेत.

होळीच्या समारंभानिमित्त पालखीचं दर्शन घेण्यासाठी ‘पारू’ पुढे येत असते मात्र, ती चालत असताना मुद्दाम मध्येच पाय टाकून दिशा तिला खाली पाडते. ‘पारू’ पडल्यावर दिशाला असुरी आनंद मिळतो. पण, इतक्यात लीला तिच्यासाठी आपला मदतीचा हात पुढे करते.

हे पाहून दिशा प्रचंड चिडते आणि म्हणते, “पारू तुझी लायकी तरी आहे का इथे येण्याची?” यावर, ‘लक्ष्मी निवास’ फेम जान्हवी, “आम्ही सगळ्याजणी तुझ्याबरोबर आहोत, तू भीड बिनधास्त पारू” असं म्हणत धीर देते.

पारू दिशाला सक्त ताकीद देते की, “इथे काहीच तमाशा करू नका.” यानंतर दिशाच्या मदतीसाठी सगळ्या खलनायिका उभ्या राहतात आणि ‘झी मराठी’च्या नायिकांना म्हणतात, “आता थोड्याच वेळात आम्ही तुमचे चेहरे काळे करून टाकणार आहे.” एवढ्यात डॅशिंग लूकमध्ये ‘शिवा’ या सोहळ्यात एन्ट्री घेते. पारू दिशाला थेट येऊन भिडते आणि ठणकावून सांगते, “पारू या पालखी सोहळ्याला येणार आणि यापुढे पारूला हात काय, तिच्याकडे तोंड वर करून सुद्धा पाहायचं नाहीस…”

‘शिवा’ जाणूनबुजून काळ्या रंगाची उधळण खलनायिका दिशाच्या चेहऱ्यावर करते. यानंतर सगळ्या नायिका ‘पारू’ला पालखीच्या दर्शनासाठी घेऊन जातात. मालिकेत हा महासंग्राम १५ आणि १६ मार्चला पार पडणार आहे. हे विशेष भाग दुपारी १२ आणि सायंकाळी ७ वाजता प्रसारित केले जाणार आहेत.