सध्या मराठी मालिकाविश्वात टीआरपी अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. टीआरपीसाठी वाहिन्यांकडून सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहेत. तसंच हटके कार्यक्रम येत्या काही दिवसांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मालिकांचा महासंगम अधिक पाहायला मिळत आहे. प्रत्येक वाहिन्या महासंगम करताना दिसत आहे. नुकताच महिला निमित्ताने ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सात तासांचा महासंगम झाला. दुपारी १ ते ३ आणि संध्याकाळी ६.३० ते ११.३० पर्यंत हा महासंगम पार पडला. त्यानंतर आता १० मार्च ते १६ मार्चला ‘घरोघरी मातीच्या चुली’मधील जानकी आणि ‘ठरलं तर मग’मधील सायली यांची महायुती पाहायला मिळणार आहे. कुटुंबाच्या रक्षणासाठी जानकी-सायली एकत्र येणार आहेत. महासंगमच्या स्पर्धेत ‘झी मराठी’ वाहिनी देखील कंबर कसून आहे. लवकरच ‘झी मराठी’वर महामालिकांचा महासंगम भेटीस येत आहे.
८ मार्चला ‘झी मराठी’ने महामालिकांचा महासंगमचा पहिला प्रोमो प्रदर्शित केला. होळीचं औचित्य साधून १५, १६ मार्चला हा मालिकांचा महासंगम होणार आहे. यामध्ये ‘झी मराठी’च्या नायिका खलनायिकांच्या दृष्ट प्रवृत्तीची होळी पेटवणार की नाही? हे पाहायला मिळणार आहे. याचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
या प्रोमोमध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकेतील नायिका व खलनायिका पाहायला मिळत आहेत. सुरुवातीला खलनायिका नायिकांना आव्हान देताना दिसत आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील दुर्गा लीलाला म्हणते, “सासूबाईंच्या हुशाऱ्या सुनांच्या डोक्यावर वाटतायत मिऱ्या.” त्यानंतर ‘सावळ्याची जणू सावली’मधील ऐश्वर्या सावलीला म्हणते की, तू म्हणजे आमच्या कुटुंबावरचा डाग. ‘पारू’ मालिकेतील दिशा पारूला म्हणते, “अगं अगं मोलकरणी. स्वप्नातही तू होणार नाहीस राजाची राणी.” मग ‘लक्ष्मी निवास’मधील सुपर्णा भावनाला म्हणते की, हिरावून घेतलीस तू आनंदी आमची, उद्ध्वस्त करेन तुझी दुनिया कायमची. पुढे ‘शिवा’ मालिकेतील किर्ती शिवाला म्हणते, “अगं ये गाव गुंड, आता बघ काढते मी कशी तुझी गाव धिंड.” नंतर सर्व खलनायिका नायिकांना म्हणतात, “आता आम्ही तुमच्या स्वप्नांची होळी पेटवणार.”
त्यानंतर नायिका खलनायिकांना प्रत्युत्तर देतात. पारू म्हणते, “होळीचा सण आहे. एक गोष्ट तुम्ही विसरताय पोरींनो.” शिवा म्हणते की, दुश्मनांच्या बैलाला ढोल ढोल. पुढे लीला म्हणते, “नानाची टांग.” सावली म्हणते, “आजीच्या चिपळ्या.” भावना म्हणते की, आजोबांचं माकड. त्यानंतर तुळजा म्हणते की, दिसतंय कसं? तेव्हा सर्व नायिका म्हणतात, “या चेटकीणींसारखं.” त्यामुळे आता ‘झी मराठी’च्या नायिका कशाप्रकारे खलनायिकांच्या दृष्ट प्रवृत्तीची होळी पेटवणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांचा महासंगमचा हा प्रोमो काही नेटकऱ्यांचा आवडला आहे. या प्रोमोचं कौतुक केलं असून हे पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं नेटकऱ्यांनी सांगितलं आहे.