Zee Marathi Makar Sankrant Vishesh : ‘झी मराठी’ वाहिनीवर मकरसंक्रांत विशेष कार्यक्रम पार पडणार आहे. यामध्ये वाहिनीवरील सगळ्या मालिकांमधले कलाकार एकत्र येऊन संक्रांत साजरी करत असल्याचं पाहायला मिळणार आहेत. या सोहळ्यात प्रेक्षकांना अनेक धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळतील. या सोहळ्याचं खास आकर्षण असणार आहे डॅडी म्हणजेच गिरीश ओक आणि बाई आजी म्हणजेच सविता मालपेकर यांचा ‘पुष्पा’ स्पेशल डान्स. या सोहळ्यात ‘झी मराठी’च्या नायिकांनी हटके उखाणे घेतल्याचं पाहायला मिळालं.
‘झी मराठी’ लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या नायिकांनी या सोहळ्यात खास ठसकेदार उखाणे घेत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत लीलाची प्रमुख भूमिका अभिनेत्री वल्लरी विराज साकारत आहे. तिने या सोहळ्यात एजेसाठी खास उखाणा घेतला आहे.
लीलाचा झकास उखाणा
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत लीला नेहमी काही ना काही मजेशीर गोष्टी करत असते, तर एजेचा स्वभाव एकदम शिस्तबद्ध दाखवण्यात आला आहे. याला अनुसरुनच लीलाने जबरदस्त उखाणा घेतला. ती म्हणाली, “एजे हे खास तुमच्यासाठी… एजे तिळासारखे कडू मी गुळासारखी गोड, आमच्यात लुडबूड करण्याऱ्यांची मोडेन चांगलीच खोड!”
तर, लीलानंतर ‘लाखात एक आमचा दादा’ फेम तुळजाने सुद्धा खास उखाणा घेतला. ती म्हणाली, “सूर्या हे खास तुझ्यासाठी… पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून मी मिरवणार, सूर्याला देईल जो त्रास त्याची मी चांगलीच जिरवणार!” नेटकऱ्यांनी या दोन्ही व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
दरम्यान, ‘झी मराठी’ वाहिनीवर मकरसंक्रातीनिमित्त विशेष सोहळा १२ जानेवारीला म्हणजे रविवारी संध्याकाळी ७ वाजता रंगणार आहे. आता या सोहळ्यात हे सगळे कलाकार काय धमाल करणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. याशिवाय यावेळी अनोखं हळदीकुंकूही पार पडणार आहे. ज्यात ‘लक्ष्मी’कडून म्हणजेच हर्षदा खानविलकर यांच्याकडून ‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्व सुवासिनींना हळदी कुंकू आणि वाण देऊन संक्रांतीच्या सणाचा आनंद द्विगुणित करण्यात येणार आहे.