‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) या मालिकेतील एजे व लीला यांची जोडी प्रेक्षकांची मने जिंकते. सुरुवातीला एकमेकांविरुद्ध असणारे, एकमेकांचा तिरस्कार असणारे आणि एकमेकांविषयी मनात गैरसमज असणारे एजे व लीला आता एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. सुरुवातीला लीलाने तिचे प्रेम व्यक्त केले होते. मात्र, एजेने त्याची पहिली पत्नी अंतरावरच त्याचे प्रेम असून, तो दुसरा कोणाचा विचार करू शकत नाही, असे त्याने स्पष्ट केले होते. मात्र, लीलाने तिच्या प्रेमळ व गोड स्वभावाने, तसेच प्रामाणिकपणाने एजेचे मन जिंकले आणि हळूहळू एजेदेखील तिच्या प्रेमात पडला. आता ते एकमेकांसाठी काही गोष्टी करताना दिसतात. एकमेकांना सुख दु:खात साथ देतात. आता मात्र या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहेत.
एजेची पहिली पत्नी अंतरा परतणार…
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर नवरी मिळे हिटलरला या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेत एजे व लीला संपूर्ण परिवारासह गुढी उभारताना दिसत आहेत. यादरम्यान, लीलावर गुढी पडताना दिसते. तर, एजे येऊन ती गुढी धरतो. त्यानंतर फोटो काढताना लीलाच्या पदराला आग लागल्याचे दिसते. ते पाहताच एजे ती आग विझवतो. त्यानंतर लीला रडताना दिसत आहे.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, आजी देवळात गेल्या आहेत. त्या देवाला म्हणतात, “देवा, मी नवस बोलले होते, त्याप्रमाणे मी अभिराम व लीलाला येथे घेऊन आले आहे. आता तूच त्यांच्याकडून नवस पूर्ण करून घे. त्याच वेळी अभिराम व लीलादेखील देवळात दिसतात. आजी जेव्हा मंदिरातून बाहेर जात असतात, तेव्हा एका मुलीचा धक्का लागून त्यांच्या पूजेच्या ताटातील कुंकवाची डबी खाली पडते. ती एका महिलेच्या पायाजवळ पडते. आजीचे लक्ष त्या महिलेकडे जाते. तर ती दुसरी-तिसरी कोणी नसून अंतरा म्हणजे एजेची पहिली पत्नी असल्याचे दिसते. तिला पाहताच आजीला धक्का बसल्याचे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. अंतराने आजीला पाहिले नसून, ती डोळे बंद करून देवाची प्रार्थना करीत असल्याचे दिसत आहे. बाजूने एजे व लीला मंदिराची प्रदक्षिणा घालत असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘अंतरामुळे एजे आणि लीलाच्या आयुष्याला मिळणार का नवं वळण?’, अशी कॅप्शन दिली आहे.
नवरी मिळे हिटलरला या मालिकेतील एजे व लीलाची जोडी लोकप्रिय आहे. त्यांची केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. आता मात्र अंतराच्या परत येण्याने नेमके काय घडणार, एजे काय करणार तो लीलाची साथ सोडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच एजे व लीलाला दूर करण्यासाठी किशोर काय करणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.