‘नवरी मिळे हिटलरला’ (Navri Mile Hitlerla) या मालिकेत नुकताच ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. एजेच्या वाढदिवशी लीलाने त्याला सरप्राइज दिले. घरातच एक छोटासा कार्यक्रम केला. सर्वांनी डान्स केला. या सगळ्यात दुर्गा मात्र तिच्या खोलीतच होती. काही दिवसांपूर्वीच ती गर्भवती असल्याचे समोर आले होते. त्यानंतर जाहगीरदारांच्या घरात आनंदी आनंद पाहायला मिळाला होता. दुर्गानेदेखील या आनंदाचा भाग असावे, तिने एजेच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सामील व्हावे असे लीलाला वाटले, म्हणून ती तिला आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली. पायऱ्यांवरून खाली येताना दुर्गाचा पाय घसरला आणि ती पायऱ्यांवरून गडगडत खाली पडली. या सगळ्यात तिला दुखापत झाली. इतकेच नव्हे तर तिला तिचे बाळ गमवावे लागले. या सगळ्याला जबाबदार लीला आहे असे दुर्गाला वाटते, म्हणून ती एजेला लीलाला घराबाहेर काढण्यासाठी सांगते. तिची तशी इच्छा असल्याचे व्यक्त करते. आता लीला घराबाहेर जात असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
दुर्गा लीलाला धमकी देणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, जहागीरदारांच्या घरात निराशेचे वातावरण आहे. लीला तिची बॅग भरून जाण्यासाठी तयार झाली आहे, तर एजे दु:खात आहे. लीला एजेला म्हणते, “अभि मला सोडायला येताय ना?” त्यावर दु:खी एजे म्हणतो, “नाही लीला, तुला असं घर सोडून जाताना मी बघू शकत नाही,” असे म्हणताना एजेच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत.
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, लीला सर्वांचा निरोप घेते. आजीच्या पाया पडते. घराबाहेर जायला निघणार तितक्यात दुर्गा तिला थांबवते. दुर्गा लीलाला म्हणते, “माझ्या स्वप्नांची राखरांगोळी केलीस तू. आता बघ मी तुझ्या स्वप्नांचं काय करते ते”, दुर्गाचे हे बोलणे ऐकल्यानंतर सर्वांना धक्का बसल्याचे पाहायला मिळत आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीलाला घर सोडवं लागणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांना लीला कधीही त्यांची सासू म्हणून आवडली नाही, त्यामुळे एजे व लीलामध्ये मतभेद व्हावेत, त्यांच्यात फूट पडावी यासाठी त्या सातत्याने कारस्थान करताना दिसतात. दुर्गाचा नवरा किशोरला एजेला उद्ध्वस्त करायचे आहे, त्यासाठी तोसुद्धा एजेविरुद्ध सातत्याने कट कारस्थान करताना दिसतो. या सगळ्यात एजेची आई लीलाला समजून घेते, तिला सांभाळून घेते. लीला व एजेची केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहण्यास आवडते. मालिकेत आता एजेची पहिली पत्नी अंतराची एन्ट्री झाली आहे, त्यामुळे अंतरामुळे लीलाच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.