लीला व एजे यांच्यातील भांडणे, रूसवे-फुगवे, एकमेकांप्रति वाटणारी काळजी, एकमेकांवर असलेले प्रेम व एकूण त्यांच्यातील केमिस्ट्री पाहण्यास प्रेक्षक उत्सुक असतात. वेंधळी लीला व परफेक्शनिस्ट एजे यांची जोडी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करते. ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) मालिकेतील लीला व एजे प्रेक्षकांचे लाडके आहेत. सुरुवातीला लीलाच्या वेंधळेपणाचा एजेला राग यायचा, तर लीलाला एजेच्या परफेक्ट असण्याची भीती वाटायची. आता मात्र दोघेही एकमेकांना समजून आणि सांभाळून घेताना दिसतात. आता या मालिकेचा एक प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

एजेच्या वाढदिवशी लीलाकडून घडणार ‘ती’ चूक

नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये दिसते की एजेचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने एजेला लीला त्याला सरप्राइज देते. त्यासाठी रात्री केक घेऊन येते. जेव्हा ती केक घेऊन एजेकडे येत असते, तेव्हा तिचा पाय जमिनीवरील कार्पेटमध्ये अडकतो आणि तिचा तोल जातो, यामुळे तिच्या हातातील केक एजेच्या चेहऱ्यावर पडतो. त्यावेळी लीलाला याआधी घडलेला प्रसंग आठवतो, ज्यावेळी लीलाच्या हातातून केक एजेच्या चेहऱ्यावर लागलेला असतो, तेव्हा एजेचा संताप लीलाने पाहिला आहे; त्यामुळे आता पुन्हा तिच्याकडून तीच चूक घडते, तेव्हा तिला एजेला राग येईल ही भीती वाटत असल्याचे तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळत आहे की, एजे लीलाला रागात म्हणतो, तुला कुठलंही काम नीट करता येत नाही? त्यानंतर लीला त्याची माफी मागत एजेला सॉरी म्हणते. त्यानंतर एजे लीलाच्या गालावर केक लावतो आणि हसतो. लीला त्याला विचारते, तुम्ही चिडला नाही? एजे तिला म्हणतो, एजे असता तर चिडला असता, पण हा अभि कसा चिडेल?

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “लीलावर वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा रागावणार एजे?”, अशी कॅप्शन दिली आहे. हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी या जोडीचे कौतुक केले आहे. असे सीन्स पाहायला आवडतील, अशा कमेंट केल्या आहेत.

आता नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये एजेची पहिली पत्नी पुन्हा त्यांच्या आयुष्यात आली आहे. आता तिच्या येण्याने एजे लीलाच्या नात्यावर काय परिणाम होकार, त्यांच्यात अंतर येणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.