लीला व अभिराम यांच्यामध्ये सध्या दुरावा आला आहे. अभिराम ऊर्फ एजेने लीलाला घराबाहेर जाण्यास सांगितले आहे. ‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlerla) या मालिकेत सध्या ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळत आहे. एजेच्या वाढदिवसाला लीलाने घरीच एक छोटा कार्यक्रम ठेवला होता, त्यामध्ये सर्वजण मजा करताना दिसत होते. मात्र, दुर्गा तिच्या खोलीत होती. ती एकटीच कार्यक्रमात सहभागी नसल्याने लीलाला वाईट वाटले आणि दुर्गाला या कार्यक्रमात सहभागी करण्यासाठी ती तिला आणण्यासाठी वरच्या मजल्यावर गेली.
पायऱ्यांवरून खाली येताना दुर्गाचा पाय घसरला आणि ती पायऱ्यांवरून गडगडत खाली पडली. या सगळ्यात तिला दुखापत झाली. इतकेच नव्हे तर तिला तिचे बाळ गमवावे लागले. या सगळ्याला जबाबदार लीला आहे असे दुर्गाला वाटते, म्हणून ती एजेला लीलाला घराबाहेर काढण्यासाठी सांगते. तिची तशी इच्छा असल्याचे ती व्यक्त करते. त्यानंतर लीला तिच्या माहेरी जाते. आता या सगळ्यात लीला व एजेला एकमेकांपासून दूर करण्यासाठी किशोर व दुर्गा कारस्थान करणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
लीला व एजेच्या लव्हस्टोरीचा होणार शेवट?
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दुर्गाला किशोर समजावून सांगतो की आता खरी वेळ आली आहे. अंतरा आईंचा वापर करून आपण एजे व लीलाच्या लव्हस्टोरीचा द एंड करू शकतो. प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की एजे लीलाला वचन देतो. तो म्हणतो, “आज मी तुला वचन देतो की मी आयुष्यभर तुझ्याबरोबर राहीन. आपल्यामध्ये कोणीही अंतर निर्माण करू शकणार नाही. एजेचे ते बोलणे ऐकून लीलाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “एजे लीलाला आयुष्यभर सोबत राहण्याचं वचन देणार”, अशी कॅप्शन दिली आहे.
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे, अंतरा ही एजेची पहिली पत्नी आहे. एजेचे तिच्यावर खूप प्रेम होते, मात्र अंतरा त्याच्या आयुष्यातून निघून गेली होती. दरम्यानच्या काळात आईच्या समाधानासाठी एजेने दुसरे लग्न केले. सुरुवातीला एजे व लीलामध्ये मोठी भांडणे, गैरसमज निर्माण झाले. मात्र, त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. लीला एजेच्या प्रेमात पडली. ज्यावेळी लीलाने एजेसमोर तिचे प्रेम व्यक्त केले, तेव्हा एजेने त्याचे फक्त अंतरावर प्रेम असल्याचे सांगितले. मात्र, लीलाने त्याचे मन जिंकले. एजे तिच्या प्रेमात पडला. आता अंतरा परतली आहे. तिच्या येण्याने एजे-लीलामध्ये अंतर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.