Zee Marathi Serial Lakhat Ek Amcha Dada : ‘झी मराठी’च्या ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत आपल्या चार बहिणींना आईसारखी माया लावणाऱ्या सूर्या दादाची गोष्ट प्रेक्षकांना पाहायला मिळतेय. या सूर्याच्या आयुष्यात बहिणींशिवाय आणखी एक व्यक्ती सर्वात महत्त्वाची असते, ती म्हणजे तुळजा. मालिकेत सूर्या दादाची भूमिका अभिनेता नितीश चव्हाण साकारत आहे. तर, त्याच्या जोडीला दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत झळकत होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच दिशाने मालिका सोडल्याचं जाहीर केलं.
प्रकृतीच्या कारणास्तव दिशाने या मालिकेतून ब्रेक घेतला आहे. मुख्य अभिनेत्रीच्या एक्झिटनंतर ‘लाखात एक आमचा दादा’मध्ये तुळजाची भूमिका कोण साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं होतं. अखेर नव्या तुळजाची एन्ट्री झाल्याचा प्रोमो प्रेक्षकांसमोर आलेला आहे.
‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत जालिंदरच्या घरातील पार्टीत गोंधळ झाल्यानंतर, सूर्या त्याच्या बहिणींना घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी, चारही बहिणी त्याला त्याची चूक लक्षात आणून देतात. आपण तुळजावर जास्तच अन्याय केल्याचं त्याच्या लक्षात येतं. सूर्या, तुळजाची माफी मागण्यासाठी विविध प्रयत्न करतोय. पण तुळजा खूप दुखावली गेली आहे. त्यातच डॅडी तुळजासमोर एक ऑफर ठेवतात. पण तेजूच्या समजूतदारपणामुळे तुळजा जालिंदरच्या ऑफरला नकार देते. दरम्यान, सूर्याचे माफी मागण्याचे प्रयत्न सुरूच असतात.
इकडे धनूला भेटायला एक भावी वर येत असल्याची माहिती मिळते. सूर्या काळजीत आहे कारण, तुळजाशिवाय पाहुणे लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकतात हे त्याला माहिती असतं. सूर्या दादा तुळजाला किमान धनूच्या लग्नाची बोलणी होईपर्यंत तरी थांबण्याची विनंती करतो. पाहुणे तुळजाच्या अनुपस्थितीबद्दल विचारपूस करतात. जालिंदर सूर्या आणि तुळजामधील संघर्ष उघड करणार तेवढ्यात तुळजा दारात येते. तुळजा सूर्याला स्पष्ट सांगते की, ती फक्त या कार्यक्रमासाठी घरात आली आहे. सूर्या, सगळं ठीक करण्याचा दृढनिश्चय करतो.
तुळजाची भूमिका साकारणाऱ्या नव्या अभिनेत्रीबद्दल…
याच ठिकाणी मालिकेत तुळजाच्या रुपात नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे. आता तुळजाच्या भूमिकेत ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत अभिनेत्री मृण्मयी गोंधळेकर झळकणार आहे.

मृण्मयीने यापूर्वी ‘स्टार प्रवाह’ची लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की असतं’ मध्ये राजमाची भूमिका साकारली होती. आता मृण्मयीच्या रुपात प्रेक्षकांना नवीन तुळजा पाहायला मिळेल.