‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमाच्या यशानंतर ‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच एक नवीन रिअॅलिटी शो सुरू होणार आहे. ‘झी मराठी’वर सध्या एकही शो सुरू नाहीये. यापूर्वी वाहिनीवर ‘चला हवा येऊ द्या’, ‘सारेगमप’, ‘होम मिनिस्टर’, ‘जाऊ बाई गावात’ असे बरेच कार्यक्रम सुरू होते. मात्र, त्यानंतर टीआरपीच्या दृष्टीकोनातून निर्णय घेत ‘झी मराठी’वर अनेक बदल करण्यात आले. आता लवकरच एक आगळावेगळा रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच सुरू होणार आहे ‘चल भावा सिटीत’, या नव्या शोचं नाव खूपच हटके आहे. याचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. यानंतर चर्चा सुरू झाली की, हा कार्यक्रम नेमका आहे तरी काय? तर, हा शो ग्रामीण आणि शहरी पार्श्वभूमीतील स्पर्धकांना एकत्र आणणार आहे. याठिकाणी ग्रामीण आणि शहरी भागातले स्पर्धक एकमेकांच्या जीवनाचा अनुभव घेतील आणि एकमेकांना आव्हान देतील. ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम प्रेक्षकांना ग्रामीण महाराष्ट्राची समृद्धी आणि संस्कृती यांचं दर्शन घडवेल. सिटीत गाव गाजणार म्हणजे नक्की काय होणार हे प्रेक्षकांसमोर हळुहळू उलगडत जाईल.
‘चल भावा सिटीत’ या शोचा जसा प्रोमो गाजतोय. अगदी त्याचप्रमाणे या नव्याकोऱ्या शोचा होस्ट नेमका कोण असणार याची सुद्धा उत्सुकता देखील प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेली आहे. वाहिनीच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर “मी येतोय…लवकरच” अशा आशयाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. पण, यामध्ये हा अभिनेता नेमका कोण आहे? याची पुसटशी झलक सुद्धा पाहायला मिळत नाहीये. मात्र, या व्हिडीओमध्ये अशी एक गोष्ट दिसतेय ज्यामुळे हा शो होस्ट करणारा अभिनेता नेमका कोण आहे हे प्रेक्षकांसमोर उघड झालं आहे.
‘चल भावा सिटीत’ हा शो बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्री गाजवणारा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे होस्ट करणार आहे. यापूर्वी त्याने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत काम केलं होतं. त्यामुळे श्रेयस आता नव्या शोच्या माध्यमातून पुन्हा एकदा वाहिनीवर कमबॅक करेल असं बोललं जात आहे. याशिवाय तशा कमेंट्स देखील या व्हिडीओवर आल्या आहेत.

मात्र, या व्हिडीओमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सर्वांच्या दृष्टीस पडलीये आणि यावरूनच ‘चल भावा सिटीत’ कोण होस्ट करणार त्या अभिनेत्याचं नाव उघड झालेलं आहे. तो अभिनेता दुसरा-तिसरा कोणीही नसून श्रेयस तळपदे आहे. वैयक्तिक आयुष्यात श्रेयसच्या उजव्या हातात दोन अंगठ्या आहेत. यापैकी एक अंगठी हिरव्या रंगाची आहे. ही अंगठी श्रेयस आपल्या करंगळीत घालतो. तर, दुसरी अंगठी ही हिऱ्याची आहे…या दोन्ही अंगठ्यांमुळे श्रेयस या नव्या शोसाठी कमबॅक करत आहे. हे प्रेक्षकांसमोर आलेलं आहे.

दरम्यान, ‘झी चित्र गौरव’ सोहळ्यात श्रेयस तळपदेने आपल्या पत्नीसह उपस्थिती लावली होती. याच सोहळ्यात ‘चल भावा सिटीत’ हा कार्यक्रम लॉन्च केला जाण्याची दाट शक्यता आहे.