सध्या छोट्या पडद्यावर नव्या मालिकांचं सत्र सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असून जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. हे सगळं काही सुरू आहे ते फक्त टीआरपीसाठी. मालिकेचा टीआरपी हा अत्यंत महत्त्वाचा झाला आहे. त्यामुळे वाहिन्या टीआरपीसाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. नव्या कथा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. अशातच आता ‘झी मराठी’ वाहिनीने आणखी एका नव्या मालिकेची घोषणा केली आहे. या नव्या मालिकेतून ‘झी मराठी’चा लोकप्रिय चेहरा पाहायला मिळणार आहे.
‘लागिर झालं जी’मधून घराघरात पोहोचलेला लाडका अज्या अर्थात अभिनेता नितीश चव्हाण ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘लाखात एक आमचा दादा’ असं ‘झी मराठी’च्या नव्या मालिकेचं नाव आहे. काल (१० मे) नव्या मालिकेचा दमदार प्रोमो समोर आहे.
“अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘झी मराठी ‘घेऊन येत आहे अस्सल पिवळं सोनं!…नवी मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ लवकरच…”, असं कॅप्शन लिहित ‘झी मराठी’च्या सोशल मीडियावर नव्या मालिकेचा पहिला-वहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये अभिनेता नितीश चव्हाणची जबरदस्त एन्ट्री पाहायला मिळत आहे. खंडोबाच्या देवळाने या प्रोमोची सुरुवात होते. त्यानंतर घंटानाद सुरू होता आणि सर्वत्र भंडारा उधळण होताना पाहायला मिळत आहे. मग मोठमोठ्याने वाजणाऱ्या तुतारीबरोबर नतमस्तक होऊन प्रार्थना करणाऱ्या ‘आमचा दादा’ची झलक होताना दिसत आहे. नितीशच्या या एन्ट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा – खासदार अमोल कोल्हेंचा अभिनय क्षेत्रातून ब्रेक! स्वतः खुलासा करत म्हणाले, “शिरुर मतदार संघातील…”
‘लाखात एक आमचा दादा’ या नव्या मालिकेच्या निर्मितीची धुरा अभिनेत्री श्वेता शिंदे सांभाळत आहे. आता नव्या मालिकेत नितीश बरोबर झळकणार त्या चार बहिणी कोण असणार? हे पाहणं उत्कंठावर्धक आहे. दरम्यान, ‘झी मराठी’ची ‘लाखात एक आमचा दादा’ ही नवी मालिका ‘झी तमिळ’ची लोकप्रिय मालिका ‘अण्णा’चा रिमेक आहे. पण असं असली तरी प्रेक्षकांना नितीश चव्हाणच्या या नव्या मालिकेचा प्रोमो चांगलाच पसंतीस पडल्याचं पाहायला मिळत आहे.