‘झी मराठी’ वाहिनीवरील दोन लोकप्रिय मालिका काही दिवसांपूर्वीच बंद झाल्या. ‘नवा गडी नवा राज्य’ या मालिकेने २३ डिसेंबरला प्रेक्षकांना निरोप घेतला. तर ‘३६ गुणी जोडी’ ही मालिका २४ डिसेंबरपासून ऑफ एअर झाली. त्यामुळे आता लवकरच ‘झी मराठी’वर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो नुकताच समोर आला आहे.
दरम्यान, १६ डिसेंबरला दोन नव्या मालिकांची घोषणा करण्यात आली होती. मनसोक्त हसणारी ‘पारू’ आणि बिनधास्त जगणारे ‘शिवा’… दोन भिन्न स्वभाव, दोन नव्या गोष्टी…एक ‘पारू’ आणि दुसरी ‘शिवा’ लवकरच ‘झी मराठी’वर, असं जुन्या प्रोमोमधून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर काल रात्री या दोन नव्या मालिकांचा नवा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामधून ‘पारू’ आणि ‘शिवा’ नेमक्या कोण असणार? हे समोर आलं आहे.
‘झी मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘पारू’ आणि ‘शिवा’ या दोन मालिकांचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये माणुसकीला जपणारी, आपुलकीने वागणारी, नितळ पारू, जणू झुळझुळणारा अवखळ झरा. अन्यायाला भिडणारी, हक्कासाठी लढणारी, लीडर शिवा, जणू धगधगता पेटता निखारा, अशी ‘पारू’ आणि ‘शिवा’ची ओळख करून देण्यात आली आहे. ‘स्टार प्रवाह’वरील ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री शरयू सोनावणे ‘पारू’ मालिकेत मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तर ‘कलर्स मराठी’वरील ‘भाग्य दिले तू मला’मधील वैदही म्हणजेच अभिनेत्री पूर्वा फडके ही ‘शिवा’ मालिकेत प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा – लग्नानंतर गौतमी देशपांडेची झाली ‘अशी’ अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली…
‘पारू’ आणि ‘शिवा’ हा दोन नव्या मालिका लवकरच ‘झी मराठी’वर सुरू होणार आहेत. शिवाय ‘झी मराठी’वर आणखी एक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘ड्रामा Juniors’ असं नव्या रिअॅलिटी शोचं नाव असून सध्या ऑडिशनची प्रक्रिया सुरू आहे.