‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘तुला जपणार आहे’ ही थ्रिलर मालिका सुरू होणार आहे. येत्या १७ फेब्रुवारीपासून ही मालिका रात्री १०.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. या मालिकेत अनेक दमदार कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे.
‘तुला जपणार आहे’ मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांमध्ये यामध्ये वापरण्यात आलेल्या जबरदस्त VFX ची चर्चा सुरु झाली, याशिवाय वाहिनीवर बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना काहीतरी आगळंवेगळं पाहायला मिळणार आहे. एका लहान मुलीला एक बाई पाण्यात ढकलते आणि तिच्या आईचं निधन झाल्याने ती आपल्या मुलीची मदत करू शकत नाही. असं या प्रोमोमध्ये सुरुवातीला पाहायला मिळतं. पण, एवढ्यात तिकडे एक तरुणी येते आणि कोणताही विचार न करता पाण्यात उडी मारते. ही तरुणी त्या लहान मुलीचे प्राण वाचवते. मालिकेत याच तरुणीची भूमिका अभिनेत्री महिमा म्हात्रे साकारत आहे. महिमाच्या पात्राचं नाव मालिकेत मीरा असं आहे.
प्रोमोत ज्याप्रकारे हा सीन दिसत होता, तितका सोपा हा मुळीच नाही. हा सीन शूट करण्यामागे संपूर्ण टीमची प्रचंड मेहनत आहे. मीराची भूमिका साकारत असलेल्या महिमा म्हात्रेने प्रोमोच्या शूटचा संपूर्ण किस्सा सांगितला आहे.
“मालिकेचा तिसरा प्रोमो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता कारण, या प्रोमोमध्ये वेदा ( लहान मुलगी ) पाण्यात पडते असं दाखवण्यात आलं आहे. हा सीन आम्ही साताऱ्यात शूट केला. जवळपास १३ – १४ फूट पाण्यात उडी मारून श्वास रोखून ठेवून त्यात चेहऱ्याचे हावभाव दाखवणं कठीण होतं. जेव्हा आम्ही रिहर्सल केली त्यावेळी माझ्या अंगावर ६ किलो वजन बांधलं होतं. शूटच्या दिवशी मी जवळपास ११-१२ तास पाण्यात होते. हिवाळा असल्यामुळे प्रचंड थंडी होती. जेव्हा शूट पूर्ण झालं तेव्हा मी एक चॅलेंज पूर्ण केलं असं जाणवलं. त्या दिवसानंतर मी आजारी पडले, पण तरीही दुसऱ्या दिवशी मी पुन्हा शूटिंगसाठी गेले. माझ्यात ते बळ कुठून आलं याची मला कल्पना नाही. आता जेव्हा हा प्रोमो पाहते तेव्हा खूप आनंद होतो आणि मेहनतीचं चीज झालं याचा प्रत्यय येतो.” असं महिमाने सांगितलं.
दरम्यान, महिमासह प्रतीक्षा शिवणकर, नीरज गोस्वामी, रुचा गायकवाड, तनिष्का विशे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, पौर्णिमा तळवलकर, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी जबरदस्त स्टारकास्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.