Zee Marathi New Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काळात अनेक नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. ‘लक्ष्मी निवास’ ही महामालिका सुरू केल्यापासून वाहिनीचा टीआरपी सुद्धा चांगल्या स्थितीत आहे. टीआरपीमध्ये आणखी मोठी झेप घेण्यासाठी आता वाहिनीने नव्या थ्रिलर मालिकेची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेची पहिली झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. आता ‘झी मराठी’ने या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करत प्रदर्शनाची तारीख व वेळ जाहीर केली आहे.
आई आपल्या लेकराच्या संरक्षणासाठी आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अग्निदिव्यांना सामोरी जाते. ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळत आहे. आई-वडील आणि त्यांची लहान मुलगी यांच्या सुखी कुटुंबाला अचानक दृष्ट लागते आणि आईचं म्हणजेच मुख्य नायिकेचं निधन होतं. यानंतर मालिकेतील खलनायिका नायकाशी लग्नाचा घाट घालते. मात्र, तिला लहान मुलीविषयी कोणतीच आपुलकी नसते, ती या मुलीला पाण्यात ढकलून देते. यानंतर स्वत:च खोटा-खोटा कांगावा करून रडू लागते. यावेळी या चिमुकलीचं रक्षण कोण करतं? निधनानंतरही तिची आई तिला कशी साथ देते या गोष्टी मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
हेही वाचा : अंकुश चौधरी पहिल्यांदाच दिसणार पोलिसाच्या भूमिकेत; ‘पी. एस. आय. अर्जुन’ चित्रपटाली लूक पोस्टर रिलीज
संपूर्ण स्टारकास्ट व प्रदर्शनाची तारीख
नव्या मालिकेत प्रमुख भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. यापूर्वी तिने ‘जिवाची होतिया काहिली’, ‘अंतरपाट’ या मालिकांमध्ये काम केलेलं आहे. याशिवाय प्रशांत दामलेंच्या एका ‘लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकात सुद्धा अभिनेत्री झळकली आहे. तर, चिमुकलीचं रक्षण करणाऱ्या मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री महिमा म्हात्रे झळकली आहे. मालिकेत प्रमुख नायकाची भूमिका ‘सारं काही तिच्यासाठी’ फेम अभिनेता नीरज गोस्वामी साकारणार आहे.
याशिवाय खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड झळकणार आहे. यापूर्वी तिने ‘सोनी मराठी’च्या ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेत काम केलेलं आहे. तनिष्का विशे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, पौर्णिमा तळवलकर, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी जबरदस्त स्टारकास्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ ही मालिका १७ फेब्रुवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.