‘झी मराठी’ वाहिनीवर लवकरच ‘तुला जपणार आहे’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतून अनेक दमदार कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता नीरज गोस्वामी आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाला आहे. त्याच्या नव्या भूमिकेविषयी अभिनेता नेमकं काय म्हणतोय जाणून घेऊयात…

‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेनंतर नीरज गोस्वामी आता ‘तुला जपणार आहे’ या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नीरज या मालिकेत अथर्वची भूमिका साकारत आहे.

नीरजने आपल्या भूमिकेबद्दल सांगताना अनेक गोष्टींना उजाळा दिला. तो म्हणाला, “या मालिकेत मी साकारत असलेल्या भूमिकेचं नाव अथर्व आहे. अथर्वच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, त्याची सध्याची मनस्थिती अशी आहे की, त्याच्या आयुष्यात एक खूप मोठं दुःख आहे. त्याची बायको अंबिका एका अपघातामध्ये मरण पावते. या अपघाताबद्दल अथर्वला काहीच माहिती नसतं. याशिवाय हा अपघात नेमका कसा झाला याचीही कल्पना नसते. त्यामुळे सध्या त्याच्या मनात केवळ त्याच्या लहान मुलीचा विचार असतो. त्याची मुलगी त्याच्याशी बोलत नसते, इतकंच नव्हे तर त्याच्याकडे बघतही नसते.”

अभिनेता पुढे म्हणाला, “अथर्व या पात्राचा एक वेगळाच प्रवास प्रेक्षकांना मालिकेमध्ये पाहायला मिळणार आहे. या मालिकेत बरेच VFX आणि इफेक्ट्स वापरले जाणार आहेत म्हणून शूट करायची पद्धत जरा वेगळी आहे. माझी या भूमिकेसाठी निवड कशी झाली याचा किस्सा सांगायचा झाला तर, ‘झी मराठी’ टीमने मला ‘सारं काही तिच्यासाठी’नंतर पुन्हा एकदा संधी दिली यासाठी मी त्यांचे मनापासून आभार मानतो. मला ऑडिशनला एक मोनोलॉग दिला होता आणि दिग्दर्शकाला ती ऑडिशन आवडली. मग ती ऑडिशन पुढे पाठवली गेली अशी ऑडिशनची प्रोसेस होती ज्यातून माझी निवड झाली. प्रोमो बघून आणि जे थोडेफार सीन्स आम्ही केलेत, त्यावरुन मी खात्री देऊ शकतो की, प्रेक्षक शर्वरी लोहकरे, ऋचा गायकवाड, प्रतीक्षा शिवणकर, सिद्धीरूपा करमरकर, संदेश उपश्याम यांसारख्या कलाकारांच्या प्रेमात पडतील. हे सर्व उत्तम कलाकार आणि त्यांच्या व्हर्साटिलिटीचा आनंद प्रेक्षकांना या मालिकेत घेता येणार आहे.”

“जेव्हा प्रोमो बाहेर प्रदर्शित झाला, तेव्हा अनेक प्रतिक्रिया मिळाल्या. एकूणच प्रोमोला चांगला रिस्पॉन्स आहे. सिनेमॅटिक पद्धतीने सर्व शूट केलं गेलं आहे. फँटसी, फिक्शन- ड्रामा असा जॉनर असलेली ही मालिका आहे. यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली आहे. रात्री १०:३० वाजताचा स्लॉट असल्यामुळे घरची आणि ऑफिसची सर्व कामं झालेली असतील. आता प्रेक्षकांना फक्त टिव्ही ऑन करून बसायचं आहे. ही मालिका बाकी मालिकांपेक्षा नक्कीच वेगळी आहे यात शंकाच नाही. प्रेक्षकांना वेगळ्या प्रकारचं मनोरंजन देणारी ही मालिका असणार आहे.” असं नीरज गोस्वामीने सांगितलं. दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ ही मालिका १७ फेब्रुवारीपासून दररोज रात्री १०.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर पाहता येणार आहे.

Story img Loader