Zee Marathi New Serial : छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांत अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळालं आहे. टेलिव्हिजनवरच्या सगळ्याच वाहिन्यांमध्ये सध्या टीआरपीसाठी चढाओढ सुरू आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक मराठी वाहिन्यांवर नव्या मालिका सुरू होणार आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये ‘झी मराठी’ वाहिनीवर ‘शिवा’, ‘पारू’, ‘लाखात एक आमचा दादा’ अशा बऱ्याच मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. अशातच आता टीआरपीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी ‘झी मराठी’कडून आणखी एका नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेचं नाव आहे ‘सावळ्याची जणू सावली’.
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेचा पहिला प्रोमो काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांसमोर आला होता. यामध्ये ‘काव्यांजली’ फेम अभिनेत्री प्राप्ती रेडकर प्रमुख भूमिकेत झळकणार असल्याचं स्पष्ट झालं होतं. परंतु, मालिकेत इतर कोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या दुसऱ्या प्रोमोमध्ये मालिकेची संपूर्ण स्टारकास्ट समोर आलेली आहे.
हेही वाचा : Video: “मला अजिबात पटलेलं नाही”, अंकिताने धनंजयला नॉमिनेट केल्यामुळे भडकली सोनाली पाटील, म्हणाली, “तुला जान्हवीबद्दल…”
मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये मुख्य नायक त्याचा वाढदिवस साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. याच नायकाची भूमिका अभिनेता साईंकित कामत साकारत आहे. यापूर्वी त्याने ‘रात्रीस खेळ चाले’, ‘तुझं माझं ब्रेकअप’ अशा बऱ्याच मालिकांमध्ये काम केलेलं आहे. नायकाला त्याची आई वाढदिवसानिमित्त आलिशान गाडी गिफ्ट करते. परंतु, या गाडीवर डेंट पडतो त्यामुळे नवीन गाडी आणा असं ती सांगते. “मी माझ्या मुलासाठी सुंदर सून शोधणार” असं ती सर्व पाहुण्यांना सांगते. यावरून अभिनेत्री सुलेखा तळवलकर सासूची भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत झळकणार हे कलाकार
प्राप्ती रेडकर, साईंकित कामत, सुलेखा तळवलकर यांच्याशिवाय या मालिकेत वीणा जगताप, गौरी करण, आशिष कुलकर्णी हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. “सावली बदलेल का सौंदर्याची परिभाषा…?” असं कॅप्शन देत हा प्रोमो ‘झी मराठी’ वाहिनीवर शेअर करण्यात आला आहे. नेटकऱ्यांनी या नव्या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ ही मालिका आता केव्हा व कुठे सुरू होणार याबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मालिकेची सगळे प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या काळात सुरू होणारी ‘सावळ्याची जणू सावली’ ही नवीन मालिका ‘झी बांगला’वरील ‘कृष्णकोली’ या मालिकेचा रिमेक असणार आहे. लवकरच या मालिकेची तारीख अन् वेळ जाहीर करण्यात येईल.