Paaru : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. अनुष्का व दिशा या दोघींपासून किर्लोस्करांचं संरक्षण केल्यामुळे सध्या पारूच्या देवीआई म्हणजेच अहिल्यादेवी किर्लोस्कर तिच्यावर प्रचंड खूश आहेत. दरम्यान, ‘झी मराठी’वर नुकताच सगळ्या मालिकांचा महासंगम पाहायला मिळाला. यामध्ये प्रत्येक मालिकेतील जोडीने परफॉर्मन्स सादर केला. यावेळी आदित्य आणि पारूने मिळून लोकप्रिय गाण्यावर डान्स केला. याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

‘ऐका दाजीबा’ या लोकप्रिय गाण्यावर पारू अन् आदित्यने ठेका धरला होता. ‘ऐका दाजीबा’ हे गाणं २००२ मध्ये प्रदर्शित झालं होतं. हे गाणं मराठीसह हिंदी कलाविश्वात तुफान गाजलं होतं. आजही लग्नसोहळ्यांमध्ये ‘ऐका दाजीबा’ गाणं आवर्जून वाजवलं जातं. या गाण्यात मिलिंद गुणाजी व इशिता अरुण ही फ्रेश जोडी झळकली होती. तर, लोकप्रिय गायिका वैशाली सामंतने हे गाणं गायलं होतं. एवढी वर्षे उलटूनही या गाण्याची लोकप्रियता कायम आहे.

‘झी मराठी’वर होळीनिमित्त पार पडलेल्या विशेष भागात ‘ऐका दाजीबा’ गाण्यावर मालिकाविश्वातील प्रेक्षकांची लाडकी जोडी ‘पारू’ आणि आदित्यने जबरदस्त डान्स केला आहे. या गाण्यावर थिरकताना दोघांचाही मराठमोळा अंदाज पाहायला मिळत आहे. पारूने निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली असून, आदित्यने सदरा घालून डोक्यावर फेटा बांधल्याचं पाहायला मिळत आहे.

पारू अन् आदित्यने तुफान एनर्जीसह या गाण्यावर डान्स केल्यावर उपस्थितांनी कौतुकाचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनी सुद्धा या जोडीचं भरभरून कौतुक केलं आहे. याशिवाय ‘पारू’ मालिकेतील लोकप्रिय खलनायिका दिशाने पारू-आदित्यच्या या डान्स व्हिडीओवर खास कमेंट करत लक्ष वेधून घेतलं आहे. दिशाची भूमिका साकारणाऱ्या पूर्वा शिंदेने आदित्य-पारूचा डान्स पाहून कमेंट्मध्ये लव्ह इमोजी दिले आहे. यावरून मालिकेत पारू अन् दिशाचे कितीही वाद दाखवण्यात आले तरीही, या व्हिडीओमुळे त्यांचं ऑफस्क्रीन बॉण्डिंग खूप छान असल्याचं स्पष्ट होत आहे.

पारू अन् आदित्यचा मालिकेपेक्षा आगळावेगळा लूक त्याच्या चाहत्यांना सुद्धा आवडला आहे. दरम्यान, ‘पारू’ मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर अनुष्काचा खरा चेहरा उघड झाल्याने आता आदित्यचं लग्न देखील मोडलं आहे. याचदरम्यान त्याला पारूवर असलेल्या प्रेमाची जाणीव होणार आहे. आता मालिकेत हा जबरदस्त ट्विस्ट केव्हा येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.