‘झी मराठी’ वाहिनीवर हा आठवडा मनोरंजनची खास मेजवानी घेऊन येणार आहे. कारण, वाहिनीवर दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम पाहायला मिळेल. ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘पारू’ या दोन मालिकांच्या विशेष भागांना २७ जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे. यासाठी दळवी आणि किर्लोस्कर कुटुंबीय एकत्र येणार आहे. या दोन्ही घरांमध्ये भव्य मंगलकार्य पार पडणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकीकडे दळवी कुटुंबात शेंडेफळ जान्हवीच्या लग्नासाठी उत्साह निर्माण झाला आहे. तर, दुसरीकडे अहिल्यादेवींनी आदित्य आणि अनुष्काच्या साखरपुड्याचा घाट घातला आहे. जयंत-जान्हवीचं लग्न आणि आदित्य-अनुष्काचा साखरपुडा एकाच वेळी, एकाच ठिकाणी पार पडतील. हे भव्य मंगलकार्य एका खास जागेवर संपन्न होत आहे. मराठी टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच दोन मालिकांमधले सोहळे एकत्र एकाच आलिशान महालात पार पडत आहेत. पण, त्याआधी अहिल्यादेवी आणि जयंतमध्ये रस्सीखेच सुरु आहे. दोघंही सोहळ्याचं ठिकाण न बदलण्यावर ठाम असतात. पण, त्याच दरम्यान अहिल्या आणि लक्ष्मी मैत्रिणी आहेत हे जयंतसमोर येतं. या दोघींच्या मैत्रीबद्दल समजताच जयंत म्हणतो की तुम्ही दोघी मैत्रिणी आहात, तर आपण या स्थळावर दोन्ही कार्यक्रम नक्की पार पाडू, पण एक अट आहे की जान्हवी आणि माझ्या लग्नाच्या सगळ्या कार्यक्रमात म्हणजे अगदी लग्न लागेपर्यंत दोन्ही कुटुंबांनी एकत्र सहभागी व्हायचं.

या भव्य मंगलकार्यात कोण-कोणते ट्विस्ट येणार हे जाणून घेऊयात… जान्हवी आणि जयंत यांच्या लग्नात भावना आणि सिद्धू यांच्यात गैरसमज निर्माण होणार आहेत. सिद्धूला असं वाटतंय की, ‘पारू’ फेम आदित्यच भावनाचा नवरा आहे आणि भावना एका मुलीची आई आहे. यामुळे तो अस्वस्थ असतो. सिद्धूला अजून एक धक्का बसतो जेव्हा त्याला समजतं की, लक्ष्मी हीच सिंचनाची सासू आहे. हे ऐकून तो चक्रावून जातो.

विश्वाही या लग्नासाठी आलेला असतो. तिथे त्याची प्रीतमशी भेट होते. ते दोघं मिळून हे भव्य मंगलकार्य बिघडवायचं ठरवतात. मात्र, विश्वा जान्हवीच्या चेहऱ्यावर आनंद बघून आपला विचार बदलतो. या प्रसंगी पारू आणि सिद्धूची मैत्री होते, जिथे सिद्धू आदित्यचं अपहरण करायचं ठरवतो.

दिशा आणि अनुष्काला एकत्र बघून पारूसमोर त्यांचं सत्य बाहेर येईल का? हा यादरम्यान मुख्य ट्विस्ट असेल. तसेच, रवीला समजतं की, तो ज्या व्यक्तीला खूप काळापासून व्यवसायासाठी कॉल करत होता, तो दुसरा कोणी नसून संपतरावच आहे. हे अपघाताचं सत्य जर कोणी बाहेर काढलं तर काय होईल, या काळजीत रवी आहे. या सगळ्यात जयंत जान्हवीचं लग्न आणि आदित्य- अनुष्काचा साखरपुडा कसा पार पडणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.

२७ जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान सायंकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत प्रेक्षकांना ‘पारू’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचे विशेष भाग पाहायला मिळतील.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi paaru and lakshmi niwas mahasangam new twist and wedding details know everything watch promo sva 00