Zee Marathi : छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते. मालिकांचा टीआरपी वाढवण्यासाठी रंजक कथानक, महासंगम, नव्या पात्रांच्या एन्ट्री अशा अनेक गोष्टी दाखवल्या जातात. नुकतीच ‘झी मराठी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या टीआरपीची आकडेवारी समोर आली आहे. या यादीत शरयू सोनावणे व प्रसाद जवादेची मुख्य भूमिका असलेल्या ‘पारू’ मालिकेने बाजी मारली आहे.
‘पारू’ मालिकेत सध्या आदित्य व पारूची लव्हस्टोरी सुरू होणार असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. त्यामुळे मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. याचा सकारात्मक परिणाम मालिकेच्या टीआरपीवर झाला आहे. ‘पारू’ मालिका सुरू झाल्यापासून आजवरचा रेकॉर्डब्रेकिंग टीआरपी या मालिकेने मिळवला आहे. या मालिकेला ४.३ टीआरपी मिळाला आहे. यामुळे ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर नंबर वन ठरली आहे.
‘पारू’ पाठोपाठ ‘झी मराठी’ वाहिनीवर दुसऱ्या स्थानावर ‘शिवा’ मालिकेचा नंबर लागला आहे. ‘शिवा’ला ४.१ टीआरपी मिळाला आहे. यानंतर तिसऱ्या स्थानावर वाहिनीवरील ‘लक्ष्मी निवास’ मालिका आहे. या मालिकेने ३.८ टीआरपी मिळवला आहे.
‘पारू’, ‘शिवा’, ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांनंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे ‘तुला जपणार आहे’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकांचा क्रमांक लागतो.
‘पारू’ मालिकेत सध्या काय सुरू आहे?
गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे. आदित्य पारूला घरी आणण्यासाठी स्वत: वेगळ्या रुपात तिच्या गावच्या शेतात जाणार आहे. डॅशिंग आदित्य पारूवरच्या प्रेमोपोटी शेतात बुजगावणं बनून उभा असतो.

आदित्य पारूला म्हणतो, “पारू आता मला तुझ्याशिवाय करमेना झालंय आणि माझं संपूर्ण आयुष्य आता तुझं झालंय” पारू हे ऐकून प्रचंड भारवते आणि आदित्य तिला अलगद मिठीत ओढून घेतो. आता आदित्य आणि पारूची अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.