Paaru Serial: काही दिवसांपूर्वी किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर पुन्हा एकदा पारू झाली. यावेळी पारू धाडसाने अनुष्काला सामोरे जाऊन ठामपणे म्हणाली होती, “पंधरा दिवसांच्या आत मी तुला किर्लोस्कर घरातून बाहेर फेकून देईल.” त्यामुळे दोघींच्या शत्रुत्वाला आणखी धार आली आहे. तर दुसऱ्या बाजूला मालिकेत दिशाची जबरदस्ती एन्ट्री पाहायला मिळाली. ५ आलिशान गाड्या, ११ बॉडीगार्ड्स आणि वेस्टर्न लूकमध्ये दिशाची एन्ट्री झाली.
तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर दिशा आता किर्लोस्कर कुटुंबाचा सर्वनाश करण्यासाठी पुन्हा आली असून तिने स्वतःची नवी कंपनी सुरू केली आहे. अनुष्काच्या साथीने किर्लोस्कर कुटुंबाला संपवण्यासाठी दिशा सातत्याने प्रयत्न करत आहे. त्यामुळे पारू दिशा आणि अनुष्कापासून किर्लोस्कर कुटुंबाची सुरक्षा करताना दिसत आहे. नुकताच ‘पारू’ मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. ज्यात पारू अनुष्काला ताकीद देताना पाहायला मिळणार आहे.
“जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी तुमच्या आणि किर्लोस्कर कुटुंबामधील भिंत बननू उभी राहिन,” असं पारूने याआधी अनुष्काला सुनावलं होतं. त्यानंतर आता पारू अनुष्काला धडा शिकवणार आहे. त्यामुळे पारूने आधीच अनुष्काला सावध केलं आहे.
‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आलेल्या नव्या प्रोमोमध्ये, अनुष्का पारूला म्हणते, “जा तुझ्या देवी आईला दिशा आणि माझं सत्य जाऊन सांग आणि त्यानंतर माहितीये ना तुला.” यावेळी अनुष्का पारूच्या मंगळसूत्राला हात लावते. त्यामुळे पारू अनुष्काचा हात पकडून म्हणते, “माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. अनुष्का मॅडम एक लक्षात ठेवा, या परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही डाव जिंकलात आणि खेळीपण तुम्हीच केलात. आता बारी आहे पारूची.”
दरम्यान, ‘पारू’ मालिकेचा हा नवा प्रोमो अनेक नेटकऱ्यांना खूप आवडला आहे. एका नेटकऱ्याने लिहिलं, “पारू तिच्या रुपात आली.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “पारू द डॉन.” तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, आता खरं बघायला मजा येणार.