Paaru Serial New twist: ‘पारू’ या मालिकेत सातत्याने काही ना काही घडत असल्याचे दिसते. नुकताच दामिनीने पारूचा अपमान केल्याचे पाहायला मिळाले. तिला बघायला आलेल्या स्थळासमोर तिचा नोकर म्हणून अपमान केला. तसेच ती घरातील मोलकरीण असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या मुलानेदेखील पारूचा अपमान केला, तेव्हा आदित्यने त्याच्या कानाखाली दिली.

आता या मालिकेच्या एका प्रोमोत आदित्य पारूला प्रपोज करणार असल्याचे पाहायला मिळत आहे. पारू सुंदर ड्रेस परिधान करून तयार झाली आहे. आदित्यने तिला सरप्राइज दिले आहे. तो तिच्यासमोर त्याच्या प्रेमाची लवकरच कबुली देणार आहे.

‘पारू’ या मालिकेत दाखविल्याप्रमाणे आधी फक्त पारू आदित्यच्या प्रेमात होती, असे पाहायला मिळाले. आदित्य तिला फक्त त्याची जवळची, विश्वासू मैत्रीण मानत असे. तो त्याच्या कंपनीच्या लोगोवरील डोळ्यांच्या प्रेमात होता. काही दिवसांपूर्वीच त्याला हे समजले आहे की, ते डोळे पारूचेच आहेत. त्यामुळे त्याच्या हे लक्षात आले की, तो पारूवरच प्रेम करतोय. याची जाणीव होताच त्याला खूप आनंददेखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्याने याबद्दल कोणालाही सांगितलेले नाही. प्रीतम, प्रिया, आई-वडील, काका कोणालाच याबद्दल त्याने कल्पना दिलेली नाही. इतकेच काय, त्याने पारूसमोरही त्याच्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत. तो पारूला चि़डवण्याचा, तिच्या मनात ईर्षा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आता आदित्यचे हे गुपित प्रीतमला समजले आहे.

‘पारू’ मालिकेत पुढे काय घडणार?

जेव्हा प्रीतमला आदित्य आणि पारूमधील प्रेमाबद्दल कळते, तेव्हा प्रीतमला वाटते की, आदित्यने पुढचे मोठे पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. प्रीतमच्या प्रोत्साहनामुळे आदित्य त्याच्या आयुष्यातील प्रेमाला प्रपोज करण्याचा गंभीरपणे विचार करू लागला. प्रीतमच्या मदतीने आदित्य पारूसाठी एक भव्य आणि अविस्मरणीय प्रपोजल प्लॅन करतो. अखेर तो क्षण येतो. सुंदर सजवलेल्या एका ठिकाणी भावना आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात आदित्य त्याच्या मनातली गोष्ट पारूला सांगणार आहे. हा एक जादुई क्षण असणार आहे, जो प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे.

गुरुजी अचानक येतात आणि पारूसमोर एक धक्कादायक खुलासा करतात. ते तिला इशारा देतात की, तिच्याच कुटुंबातील कोणीतरी तिला इजा करण्याचा कट रचत आहे. ही भविष्यवाणी नव्याने फुललेल्या प्रेमात वादळ निर्माण करणार का? आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरत आहे.