Upcoming Twist in Paaru Serial: ‘पारू’ (Paaru) या मालिकेत काही ना काही ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळतात. कधी अहिल्यादेवीचा पारूबाबत गैरसमज होतो, कधी ती विश्वासाने तिच्या डोक्यावर मायेचा हात फिरवते, कधी कानाखाली देते, तर कधी तिला मायेने जवळ घेते. पारू अहिल्यादेवीची लाडकी आहे. ती पारूवर विश्वास ठेवते म्हणून दामिनीला राग येतो. त्यामुळे दामिनी पारूविरुद्ध सतत कारस्थान करीत असते.
मात्र, दामिनीला तिच्या या कारस्थानांत वारंवार अपयश येते. त्यामुळे तिला पारूविषयी असूया वाटते. पारू मात्र निष्ठेने किर्लोस्करांची सेवा करीत असते. ती अहिल्यादेवीला देवी आणि आदित्यला नवरा मानते. आदित्यवर ती खूप प्रेम करते. तसेच, पारू किर्लोस्करांच्या घरावर कोणतेही संकट आले तरी त्याला सर्वांत आधी सामोरे जाते. आदित्यला ती वेळोवेळी मदत करते.
आदित्य करणार ‘ती’ चूक
पारू या मालिकेत आधी फक्त पारू आदित्यच्या प्रेमात होती, असे पाहायला मिळाले. आदित्य तिला फक्त त्याची जवळची, विश्वासू मैत्रीण मानत असे. तो त्याच्या कंपनीच्या लोगोवरील डोळ्यांच्या प्रेमात होता. काही दिवसांपूर्वीच त्याला हे समजले आहे की, ते डोळे पारूचेच आहेत. त्यामुळे त्याच्या हे लक्षात आले की, तो पारूवरच प्रेम करतोय. याची जाणीव होताच, त्याला खूप आनंददेखील झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, त्याने याबद्दल कोणालाही सांगितलेले नाही. प्रीतम, प्रिया, आई-वडील, काका कोणालाच याबद्दल त्याने कल्पना दिलेली नाही. इतकेच काय, त्याने पारूसमोरही त्याच्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत. तो पारूला चि़डवण्याचा, तिच्या मनात ईर्षा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आता आदित्यचे हे गुपित अहिल्यादेवीला समजणार का, असा प्रश्न मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर पडत आहे.
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, आदित्य त्याच्या खोलीमध्ये आहे. तो एका फोटोवर कविता लिहीत आहे. तो ही कविता मोठ्याने म्हणत लिहीत असल्याचे दिसत आहे. तो म्हणतो, “तुझ्या सोबतीची आस, तुझ्या डोळ्यांतील प्रकाश, येईल मग अर्थ जगण्याला…”, हे म्हणताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. आदित्य ही कविता म्हणत असतानाच प्रीतम त्याच्या खोलीत येतो. तो वाह, वाह, असे म्हणतो. प्रीतमला पाहताच आदित्य हातातील फोटो समोर असलेल्या फाईलमध्ये लपवतो.
प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, ती फाईल आदित्यचा काका अहिल्यादेवीकडे घेऊन जातो. कामासंबंधीची कागदपत्रे बघून घ्या, असे सांगतो. आदित्य ऑफिससाठी तयार होतो. त्याच्या खोलीत ती फाईल नसल्याची त्याला जाणीव होते. त्यामुळे तो गोंधळून जातो. मोहन काका आला होता. त्याने आईकडे फाईल नेली असेल. आईने फाईल उघडून तो फोटो बघितला तर… असे म्हणत तो त्याच्या खोलीतून पळत अहिल्यादेवी बसली आहे, त्या ठिकाणी येतो. तितक्यात अहिल्यादेवी फाईलचे पान उलटत असल्याचे दिसते. त्याखाली फोटोदेखील दिसत आहे. त्यानंतर ती आदित्यकडे पाहते.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर करताना, अहिल्यासमोर आदित्यच्या मनात पारू असल्याचे सत्य येईल का, अशी कॅप्शन दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच, आदित्यचे पारूवर प्रेम असल्याचे समोर आल्यानंतर अहिल्यादेवी तिला स्वीकारणार का हे पाहणेदेखील महत्त्वाचे आहे.