‘पारू’ (Paaru) मालिकेत नुकताच एक मोठा ट्विस्ट आल्याचे पाहायला मिळाले. दिशा व अनुष्काचे कारस्थान त्यांच्यावरच उलटले आणि अनुष्काला तिचा जीव गमवावा लागला; तर दिशाने किर्लोस्कर कुटुंबीयांना तिच्या बहिणीच्या मृत्यूचा बदला घेणार असल्याची पुन्हा एकदा धमकी दिली आहे. आता किर्लोस्कर कुटुंबात पुन्हा एकदा शांतता आणि आनंदाचे वातावरण दिसत आहे. या सगळ्यात किर्लोस्कर कुटुंब पारूसह होळीच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे पाहायला मिळाले. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये आदित्यला त्याच्या पारूविषयीच्या प्रेमाची जाणीव होणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

आदित्यला पारूवरील त्याच्या प्रेमाची जाणीव होणार

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर ‘पारू’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आदित्यला तो ज्या मुलीचा शोध घेत होता, ती पारू असल्याची जाणीव होते. तो ज्या फोटोमधील डोळ्यांशी बोलायचा, ते डोळे पारूचे असल्याचे आदित्यच्या लक्षात येते. त्याच्या डोळ्यांसमोर त्यांच्यामधील अनेक चांगले क्षण तरळतात. यावेळी आदित्य स्वत:शीच म्हणतो, “डोळ्यांना डोळ्यांचीच भाषा कळते. म्हणून तर पहिल्या नजरेत प्रेम जडलं. एक कोपरा मनात बाकी ठेवून तिच्या भेटीसाठी मन वाऱ्यावर स्वार झालं; पण आज समजलं हेच ते वळण, हाच तो क्षण, जिथे डोळ्यांनी डोळ्यांना ओळखलं”

‘पारू’ मालिकेचा सोशल मीडियावर हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘स्वप्नातल्या डोळ्यांची अखेर ओळख पटणार; आदित्य-पारूचं नातं नव्याने बहरणार’, अशी कॅप्शन दिली आहे.

पारू ही वडील व अहिल्यादेवींची सेवा करण्यासाठी गावाहून शहरात आलेली मुलगी. नम्र व तितकीच धाडसी अशी ही पारू किर्लोस्कर कुटुंबातील सर्वांची मने जिंकून घेते. अहिल्यादेवी किर्लोस्करला ती देवी मानते. तिचा कोणीही अपमान केला, तर ती सहन करू शकत नाही. ‘पारू’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा जेव्हा किर्लोस्कर कुटुंब संकटात सापडते, तेव्हा तेव्हा पारू त्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. अहिल्यादेवी किर्लोस्करचा मोठा मुलगा आदित्य व पारू यांची चांगली मैत्री होते.

पारू किर्लोस्कर कंपनीच्या एका प्रॉडक्टची ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर आहे. याच प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. आदित्यसाठी हे फक्त शूटिंग असले तरी पारूने ते सर्व सत्य मानले. तेव्हापासून ती आदित्यला नवरा मानते आणि ती त्याच्या प्रेमात पडली आहे. आदित्य तिला त्याची फक्त चांगली मैत्रीण मानत होता. पण, आदित्यला एका मुलीचे डोळे आवडले होते, त्या सुंदर डोळ्यांच्या तो प्रेमात पडला होता. त्याच्याकडे फक्त त्या मुलीच्या डोळ्यांचाच फोटो होता. ते डोळे नेमके कोणाचे आहेत, याचा शोध आदित्य अनेक दिवसांपासून घेत होता. आता त्याचा शोध पूर्ण झाला असून, तो पारूवर प्रेम करत असल्याची जाणीव त्याला झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे आता पारू व आदित्य या दोघांचे नाते काय वळण घेणार, मालिकेत पुढे काय होणार, अहिल्यादेवीला पारू तिची सून म्हणून मान्य असणार का, हे पाहणे प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचे असणार आहे.

Story img Loader