Paaru Serial New Promo: ‘पारू’ (Paaru) मालिकेतील आदित्य त्याचे प्रेम पारूसमोर कधी व्यक्त करणार याची प्रेक्षक वाट बघत होते. आता प्रेक्षकांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षकांना पारू व आदित्य कधी एकत्र येणार याची उत्सुकता होती. आता झी मराठी वाहिनीने ‘पारू’ मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे.
पारू व आदित्यच्या प्रेमाचा प्रवास सुरू होणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये आदित्य व पारू यांच्यामधील गोड क्षण पाहायला मिळत आहेत. त्याबरोबरच आदित्यचा आवाज ऐकायला मिळतो. तो म्हणतो की, “पारू तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण आयुष्य फुलवून गेला. तू मला सावरताना प्रेमाचा अर्थ सांगून गेला. समोर होतीस; पण ओठांनी शब्दांना बांध घातला. आज मात्र, मनातल्या भावना तुझ्या प्रेमासाठी आतुर झाल्या आहेत.” या व्हिडीओमध्ये आदित्य व पारू यांच्यातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील क्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘सुरू होतोय पारू आणि आदित्यच्या प्रेमाचा प्रवास’, अशी कॅप्शन दिली आहे.
पारू या मालिकेत दाखविल्याप्रमाणे, किर्लोस्करांच्या कंपनीच्या प्रॉडक्टवर डोळ्यांचा लोगो आहे. तो त्या डोळ्यांच्या प्रेमात पडला आहे. तो अनेक दिवसांपासून असे सुंदर डोळे असलेल्या मुलीच्या शोधात होता. अखेर ते डोळे पारूचेच असल्याचे सत्य त्याच्यासमोर आले आहे. पारूच ती सुंदर डोळ्यांची मुलगी असल्याचे समजल्यानंतर त्याला खूप आनंद झाला आहे. मात्र, त्याने पारूसमोर त्याच्या भावना व्यक्त केलेल्या नाहीत.
दुसरीकडे, पारू आदित्यला नवरा मानते. त्याच्यावर प्रेम करते. किर्लोस्करांची मोठी सून म्हणून सगळी कर्तव्ये पार पाडते. आदित्यवर कोणतेही संकट येणार असेल, तर ती त्याला धैर्याने सामोरी जाते. किर्लोस्करांच्या घरात दामिनी वगळता इतर सर्वांना ती खूप आवडते. आता आदित्य पारूसमोर तिच्या भावना कधी व्यक्त करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच अहिल्यादेवी व पारूचे वडील या सगळ्याला मान्यता देणार का, मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.