‘पारू’ (Paaru) मालिका दिवसेंदिवस रंजक होताना दिसत आहे. मालिकेत सतत काही ना काही ट्विस्ट येताना दिसतात. कधी अहिल्यादेवी पारूचे कौतुक करते; तर कधी तिच्यावर अविश्वास दाखवते, कधी पारू किर्लोस्करांना तिची माणसे समजून मोठ्या मनाने मदत करते. आदित्य पारूला चांगली मैत्रीण समजतो; मात्र पारू त्याच्या प्रेमात आहे. आता या मालिकेत नवीन ट्विस्ट आला असून, किर्लोस्कर कंपनीला पुन्हा एकदा संकटातून बाहेर काढण्यासाठी पारूने मदत केल्याचे पाहायला मिळाले.
दिशाने काही दिवसांपूर्वी किर्लोस्करांना कंपनीच्या लोगोबाबत एक कायदेशीर नोटीस पाठवली होती. तसेच त्यांना धमकीदेखील दिली होती की, जर किर्लोस्करांनी आठ दिवसांच्या आत त्यांना हा लोगो कसा मिळाला याचे पुरावे सिद्ध केले नाहीत, तर दिशा तिच्याकडील पुरावे सादर करून, त्यावर हक्क सांगेल. त्यानंतर किर्लोस्करांना लोगोचा हक्क सोडावा लागेल. लोगोवरील डोळे पारूचे आहेत हे फक्त हरीशला माहीत असते आणि इतर कोणालाही याबद्दल कल्पना नाही. ते डोळे कोणाचे आहेत हे शोधण्यासाठी किर्लोस्करांनी एक स्पर्धा घेतली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आधी पारू तयार नव्हती; मात्र सावित्रीने समजावले की, या स्पर्धेत येणाऱ्या मुलींचे फक्त डोळे दिसतील आणि चेहरा झाकलेला असेल. त्यामुळे पारूचा चेहरा दिसणार नाही. त्यानंतर ती या स्पर्धेत सहभागी होण्यास तयार झाली. मग पारूने स्पर्धेत सहभागी होत, तिचे डोळे स्कॅन केले आणि तिचे डोळे लोगोवरील डोळ्यांशी बरोबर मॅच झाले. त्यामुळे किर्लोस्कर मोठ्या संकटातून वाचले. या सगळ्यात पारूने तिची ओळख दाखवली नाही. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिशा तिचा राग व्यक्त करताना दिसत आहे.
“त्या मुलीनं हुशारीनं…”
‘पारू’ मालिकेचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दिशाचा संताप अनावर झाला आहे. ती स्वत:शीच म्हणते, “आज जर ती पारू नसती, तर संपूर्ण किर्लोस्कर कंपनी ज्या लोगोवर माज करतेय, तो लोगो माझा असला असता.” पुढे पाहायला मिळते की, सावित्रीआत्या पारूला शाबासकी देत म्हणते, “पारू बाळा यावेळीसुद्धा तू तुझं सुनेचं कर्तव्य पार पाडलंस आणि आपल्या माणसांना संकटापासून वाचवलंस.” याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, प्रीतम पारूला म्हणतो, “त्या मुलीनं हुशारीनं आपला लोगो वाचवला. पण, जेव्हा ती रिक्षातून घरी जात होती, तेव्हा मी तिचा चेहरा बघितलाय”, प्रीतमचे हे बोलणे ऐकल्यानंतर पारूच्या चेहऱ्यावर धक्का बसल्याचे दिसत आहे. हा प्रोमो शेअर करताना, झी मराठी वाहिनीने, ‘पुन्हा एकदा पारू किर्लोस्करांना संकटातून वाचवणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे, पारू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. प्रॉडक्टच्या जाहिरातीच्या शूटिंगमध्ये आदित्यने पारूच्या गळ्यात मंगळसूत्र घातले होते. त्यानंतर पारू आदित्यला नवरा; तर स्वत:ला किर्लोस्करांची मोठी सून मानते. आदित्य मात्र तिला चांगली मैत्रीण मानतो. जेव्हा लोगोवरील डोळ्यांचे सत्य आदित्यसमोर येईल, तेव्हा त्याची काय प्रतिक्रिया असणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.