मराठी मालिकाविश्वात सातत्याने नवनवीन प्रयोग केले जात आहेत. अर्धा तासाच्या मालिका आता एक, दीड तासांच्या केल्या आहेत. तसंच लवकरच हटके कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. काही दिवसांपूर्वी ‘झी मराठी’ने एका नव्या कार्यक्रमाची घोषणा केली. ‘चल भावा सिटीत’ असं ‘झी मराठी’च्या नव्या कार्यक्रमाचं नाव आहे. त्यामुळे या कार्यक्रमात काय हटके पाहायला मिळतंय? हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. पण, अशातच दुसऱ्या बाजूला ‘झी मराठी’ वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच ऑफ एअर होणार असल्याचं समोर आलं आहे.

गेल्या वर्षी ‘झी मराठी’ वाहिनीने लागोपाठ पाच ते आठ नव्या मालिकांची घोषणा केली होती. ‘शिवा’, ‘पारू’ पाठोपाठ ‘नवरी मिळेल हिटलरला’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. ‘झी मराठी’च्या या पाचही मालिकांनी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं. तसंच टीआरपीच्या शर्यतीतही या पाच मालिकांनी स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलं. पण या पाच मालिकांमधील एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

सूत्रांनुसार, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका लवकरच बंद होणार आहे. १८ मार्च २०२४पासून सुरू झालेली ही मालिका ‘झी टीव्ही’वरील ‘पुनर्विवाह – जिंदगी मिलेगी दोबार’ या मालिकेचा मराठी रिमेक आहे. पण, आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेचं चित्रीकरण शेवटच्या टप्पात आलं आहे. एक वर्षही पूर्ण न होता ही मालिका ऑफ एअर होणार आहे.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर व अक्षय म्हात्रे यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तसंच वंदना सरदेसाई, मृणाल देशपांडे, सुदेश म्हाशीलकर, शुभांगी सदावर्ते, पंकज चेंबूरकर, क्षमा निनावे, सिद्धेश प्रभाकर, रेयांश जुवाटकर, रुही जवीर असे अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकले आहेत. या मालिकेतील वसुंधरा आणि आकाशची जोडी प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. पण, आता मालिका काही दिवसांनी प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

दरम्यान, ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेची आतापर्यंत दोनदा वेळ बदलण्यात आली. २२ डिसेंबर २०२४पर्यंत ही मालिका रात्री ९.३० पर्यंत प्रसारित होतं होती. पण आता ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिका संध्याकाळी ६ वाजता पाहायला मिळत आहेत. परंतु, ही मालिका ऑफ एअर झाल्यानंतर या वेळेत कोणती मालिका किंवा कार्यक्रम प्रसारित होणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Story img Loader