Zee Marathi Serial Off Air : छोट्या पडद्यावर प्रसारित होणाऱ्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवर ठरत असते. त्यामुळे सध्या सगळ्या वाहिन्यांवर टीआरपीच्या दृष्टीने बदल केले जात आहेत. येत्या काही दिवसांत अनेक नवनवीन मालिका छोट्या पडद्यावर सुरू होणार आहेत. ‘झी मराठी’ वाहिनी गेली २५ वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. येत्या काही महिन्यांमध्ये वाहिनीवर ‘तुला जपणार आहे’, ‘इच्छाधारी नागीण’ अशा नवीन मालिका सुरू होणार आहेत. याशिवाय ‘लक्ष्मी निवास’ ही कौटुंबिक मालिका सुद्धा येत्या २३ डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे वाहिनीवरच्या काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहेत.
‘झी मराठी’वर १२ सप्टेंबर २०२२ रोजी ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या रहस्यमय मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास २ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
मालिकेतील कलाकारांच्या पोस्ट चर्चेत
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत तितीक्षा तावडे, ऐश्वर्या नारकर, अजिंक्य ननावरे, एकता डांगर, अमृता रावराणे, श्वेता मेहेंदळे, अजिंक्य जोशी, अभिजीत केळकर या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या कलाकारांचं सेटवर ऑफस्क्रीन एकदम घट्ट बॉण्डिंग झाल्याचं Reels व्हिडीओमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळे मालिकेप्रमाणे या कलाकारांची यांची पडद्यामागची धमाल सुद्धा प्रेक्षक तेवढीच मिस करणार आहेत.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेतील कलाकारांनी ‘शेवटचा दिवस’ असं कॅप्शन देत सेटवरचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तितीक्षाने ‘नेत्रा म्हणून शेवटचा दिवस’ असं म्हणत एक नेत्राच्या लूकमधील व्हिडीओ देखील शेअर केला आहे. तर, ऐश्वर्या नारकरांच्या इन्स्टाग्राम स्टोरींमध्ये शेवटच्या दिवसांच्या शूटिंगची झलक पाहायला मिळतेय. एकंदर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’च्या सेटवर सध्या मालिका निरोप घेणार असल्याने भावनिक वातावरण तयार झालं आहे.
हेही वाचा : ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई! मालिकेतील कलाकारांनी केलं केळवण, सुंदर सजावटीने वेधलं लक्ष
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ( Zee Marathi ) ही मालिका रोज रात्री १०.३० वाजता प्रसारित केली जायची. आता ही मालिका संपल्यावर याची जागा कोणती मालिका घेणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.