Snehlata Maghade on Trolling: सोशल मीडियावर जितके एखाद्याचे कौतुक होते, तितकेच ट्रोलिंगदेखील होते. अनेक कलाकारांना विविध गोष्टींमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. काही कलाकार त्याला उत्तर देताना दिसतात, अनेकदा त्यावर व्यक्त होतात.
स्नेहलता माघाडे म्हणाली…
आता ‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेत अभिनेत्री स्नेहलता माघाडे अस्मी या भूमिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेसाठी तसेच तिच्या दिसण्यावरून अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो, असे वक्तव्य तिने केले आहे.
स्नेहलता माघाडेने नुकताच स्टार मीडिया मराठीशी संवाद साधला. स्नेहलता म्हणाली, “मी सोशल मीडियावरील कमेंट्स आवर्जून वाचते. लोक मला माझ्या पात्रावर नकारात्मक प्रतिक्रिया देतात, पण माझ्या दिसण्यावरूनदेखील खूप कमेंट्स असतात. चेहऱ्यावर किती फॅट आहे, काकूसारखी दिसते, हिरोला शोभत नाही हिला का घेतलं आहे? अजून सुंदर मुलगी घ्यायला पाहिजे होती, अशा खूप गोष्टी बोलल्या जातात.
पुढे अभिनेत्री म्हणाली, “या सगळ्यावर मात करून काम करावं लागतं. जे कमेंट करतात त्यांना माहीत नाही की मी कोणत्या परिस्थितीतून जाते, माझी जीवनशैली काय आहे, मी किती मेहनत करते, सगळेच कलाकार किती मेहनत करतात, खूप ट्रोल करण्याचा प्रयत्न करतात; पण मी त्याचा परिणाम करून घेत नाही”, असे म्हणत सोशल मीडियावर ट्रोलिंगचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो, असे वक्तव्य तिने केले आहे.
स्नेहलताने ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत साकारलेली अस्मी ही भूमिका नकारात्मक आहे. सारंग तिच्या प्रेमात पडला होता, अस्मी मात्र पैशांसाठी सारंगच्या आयुष्यात आली होती. जगन्नाथने तिला सारंगच्या आयुष्यात आणले होते.
पुढे जगन्नाथच्या योजनेप्रमाणेच अस्मीला किडनॅप करण्यात आले आणि सारंग व सावलीचे लग्न झाले. काही दिवसांनंतर अस्मी आता पुन्हा सारंगच्या आयुष्यात आली आहे. मात्र, सारंगचा तिच्यावरचा राग गेला नाही. दुसरीकडे सारंग व सावलीमध्ये चांगली मैत्री झाल्याचे पाहायला मिळाले.
मालिकेत दाखविल्याप्रमाणे सावलीने सारंगला त्रास होऊ नये म्हणून मेहंदळेंचे घर सोडण्याचा निर्णय घेतला. ते पाहिल्यानंतर ऐश्वर्या व अस्मीने सावलीने पत्र लिहिले आहे असे सांगून एक खोटे पत्र वाचले, ज्यामध्ये सावलीने जगन्नाथबरोबर मिळून कट कारस्थान केल्याचा गुन्हा मान्य केला होता.
हे पत्र ऐश्वर्याने लिहिले होते. दुसरीकडे कोणालाही न सांगता घराबाहेर पडलेल्या सावलीला एक ट्रक धडक देतो. त्याचा ड्रायव्हर तिचा मृत्यू झाला आहे, असे समजून तिला नदीपात्रात फेकून देतो. सावली एका किनाऱ्याजवळ येऊन पोहोचते. एक जोडपे तिला घरी आणते आणि तिच्यावर उपचार केले जातात.
आता सारंगला सावलीचे सत्य केव्हा समजणार, तो तिला घरी परत आणू शकणार का, मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.