‘सावळ्याची जणू सावली’ (Savlyachi Janu Savali) या मालिकेत सावली आणि सारंगचे त्यांच्या मनाविरुद्ध लग्न झाले. जनन्नाथने तिलोत्तमाचा बदला घेण्यासाठी तिचा मुलगा सारंग व सावलीचे लग्न लावले. तिलोत्तमाने मात्र सावली सावळी दिसत असल्यामुळे सावलीला तिची सून मानण्यास नकार दिला. सुरुवातीला सारंगलादेखील सावलीचा राग यायचा. मात्र, सावलीने तिच्या गोड स्वभावाने सारंगचे मन जिंकले. त्यांच्यात सध्या उत्तम मैत्री असल्याचे दिसते. काही दिवसांपूर्वी लग्नात ऐन वेळी गायब झालेली अस्मी सारंगच्या आयुष्यात आणि त्यांच्या घरात परत आल्याचे पाहायला मिळाले. तिला सारंगच्या आयुष्यात पुन्हा तिची जागा हवी आहे. त्यासाठी ती सावलीला सांरगपासून दूर करण्याचा प्रयत्न करते.

ऐश्वर्या व अस्मी मिळून सावलीला त्रास देतात. त्याला सावली तिच्या प्रामाणिक प्रयत्नांनी उत्तर देताना दिसते. दुसरीकडे भैरवीदेखील वेळोवेळी सावलीला त्रास देते. सावलीच्या माहेरची परिस्थिती गरीब आहे. तिच्या लहान भावाच्या अप्पूच्या दवाखान्यासांठी त्यांना पैशाची गरज लागते. त्यासाठी सावली भैरवीच्या मुलीसाठी तारासाठी गाते. भैरवीची मुलगी गाणे गात असल्याचा अभिनय करते; मात्र खरा आवाज हा सावलीचा असतो. त्या बदल्यात भैरवी सावलीच्या कुटुंबीयांना पैसे देते. भैरवी अनेकदा सावलीला त्रास देते, तिचा अपमान करते. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये सावली भैरवीला तिच्या अस्तित्वाची जाणीव करून देणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

सावली भैरवीला करून देणार तिच्या अस्तित्वाची जाणीव

सावळ्याची जणू सावली या मालिकेत दाखविल्याप्रमाणे सावलीचा लहान भाऊ अप्पू आजारी पडला होता. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. त्यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यावेळी सावलीने भैरवीकडे मदत मागितली होती. मात्र, भैरवीने तिचा अपमान करीत मदत करणे नाकारले होते. आता समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, भैरवी सावलीला म्हणते, “हे नवीन गाणं आहे. नीट रियाज कर.” त्यावर सावली म्हणते, “सकाळी मी हक्कानं माझी एक गरज घेऊन तुमच्याकडे आले होते.” त्यावर भैरवी बेफिकिरपणे म्हणते की, तू कोण आहेस? सावली त्याला उत्तर देत म्हणते, “मी ताराचा आवाज आहे”. भैरवी तिला म्हणते, “मी आहे म्हणून तू आहेस”. त्यावर सावली तिला म्हणते, “माई, नशि‍बाचं चक्र खूप विचित्र असतं. उद्या तुमच्याकडे मी असेन, तर तारा मॅडमसुद्धा असतील; पण नियतीनं धोका दिला तर…”. त्यानंतर भैरवीच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचे दिसत आहे.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘भैरवीला सावली करून देणार तिच्या अस्तित्वाची जाणीव’, अशी कॅप्शन दिली आहे. आता ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये पुढे काय होणार, मालिकेत काय ट्विस्ट येणार, अस्मीच्या येण्याने सावली-सारंगच्या मैत्रीत दुरावा येणार का हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.