‘पारू'(Paaru) मालिकेतील किर्लोस्कर कुटुंब हे सधन आहे. त्यांची मोठी संपत्ती आहे. मोठ्या कंपनीचे हे कुटुंब मालक आहेत. त्यांच्या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी, किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीची मालकीण होण्यासाठी दिशाला किर्लोस्कर घराची सून व्हायचे होते, त्यासाठी तिने एक योजना आखली होती. अहिल्यादेवी व श्रीकांत यांचा लहान मुलगा प्रीतमबरोबर लग्न करायचे आणि किर्लोस्कर घराची सून व्हायचे. मात्र, प्रीतमचे तिच्यावर प्रेम नव्हते. दिशा सर्वांसमोर त्याला चांगली वागणूक देत असे आणि इतरवेळी ती त्याचा वाईट पद्धतीने अपमान करत असे. तिचे हे सत्य अनेकदा सांगण्याचा प्रीतमने प्रयत्न केला, मात्र त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही. त्याचदरम्यान प्रीतमच्या आयुष्यात प्रियाची एन्ट्री झाली. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आदित्य व पारूने दिशाचे सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी आणि प्रीतम व प्रियाचे लग्न लावून देण्यासाठी मेहनत घेतली. ऐन लग्नात त्यांनी दिशाचे खरे रूप सर्वांसमोर उघड केले. त्यानंतर अहिल्यादेवीने तिला शिक्षा भोगण्यासाठी तुरूंगात पाठवले आणि प्रीतम व प्रियाचे लग्न लावून दिले.
काही दिवसांनंतर अनुष्का नावाची तरुण यशस्वी उद्योजिका किर्लोस्करांच्या आयुष्यात आली. ठाम मते असणारी, आत्मविश्वास असणारी, प्रेमळ, सर्वांचा आदर करणारी, चूकला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणणारी ही अनुष्का सर्वांना आवडली. आदित्यची पत्नी म्हणून तीच योग्य असल्याचे किर्लोस्कर कुटुंबातील सर्वांनी सांगितले. मात्र, प्रीतमच्या बाबतीत दिशाला निवडताना जी चूक झाली होती, ती आदित्यबरोबर होऊ नये म्हणून अहिल्यादेवीने अनुष्काची परीक्षा घेतली. त्या परीक्षेत अनुष्का पासदेखील झाली आणि अनुष्का-आदित्यचा साखरपुडा झाला. यादरम्यान हे पाहायला मिळाले की अनुष्का व दिशा बहिणी आहेत आणि दिशाला किर्लोस्करांमुळे जो त्रास सहन करावा लागला, त्याचा बदला घेण्यासाठी अनुष्का किर्लोस्करांच्या आयुष्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी दिशादेखील तुरूंगातून बाहेर आली. तिने आल्यानंतर लगेचच अहिल्यादेवीला आव्हान दिले. त्यानंतर दिशाने किर्लोस्कर कुटुंबाला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. या सगळ्यात पारूला दिशा व अनुष्काचे सत्य समजले. तिने आदित्यला वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळीच दिशा व अनुष्काने हरिशला हाताशी धरून पारूच्या भावाला किडनॅप केले. आता मात्र दिशा व अनुष्काच्या कारस्थानाचा शेवट होणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
पारू, आदित्य अन् अहिल्यादेवी एकत्र येणार
झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, आदित्य बाहेर गेला आहे, तो एका ठिकाणी थांबला आहे. पारू त्याला फोन करून सांगते की तुम्ही लवकर घरी या. तितक्यात एक गाडी त्याला धडक देताना दिसत आहे. त्यानंतर आदित्यला अनुष्काने किडनॅप केल्याचे दिसत आहे. अनुष्का पारूला फोन करून म्हणते, “आदित्यची काळजी करू नकोस, तो माझ्याबरोबर आहे.” त्यानंतर अहिल्या आदित्यला वाचवण्यासाठी जात असल्याचे दिसते. ती पारूला म्हणते, “पारू या सगळ्यात मला काही झालं तर तू सगळ्यांना सावरशील.” पुढे प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, अहिल्यादेवी व आदित्यला बांधून ठेवले आहे, तिथेच दिशा पारूला घेऊन येते व तिला म्हणते, “या दोघांना तुझ्या नजरेसमोर तडफडून तडफडून मारून टाकणार आहे. त्यानंतर त्या तिघांना बांधून ठेवलेल्या ठिकाणी दिशा रॉकेल ओतते. त्यानंतर ती काडी ओढते व रॉकेल टाकलेले ठिकाण पेट घेताना दिसत आहे. अचानक आदित्यचे हात सुटतात व पारू अहिल्यादेवीसह तो बाहेर येतो आणि आग लागलेल्या रिंगणात अनुष्का ढकलली जाते. त्यानंतर अनुष्का मदतीसाठी ओरडत असल्याचे दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “आता पापांचा भरलाय घडा, अन्यायाविरोधात पारू देऊ शकेल का लढा”, असे कॅप्शन दिले आहे. आता हा प्रोमो पाहिल्यानंतर मालिकेत नेमके काय होणार, काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. दिशा व अनुष्का माघार घेणार की त्यांच्या योजनेत यशस्वी होणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.