‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत सध्या एजे आणि लीलाचं प्रेम बहरत असल्याचा सीक्वेन्स चालू आहे. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या असतात. आपल्या बायकोची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची विशेष काळजी घ्यायची असं एजेने ठरवलेलं असतं. लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाइल प्रपोज हवं असतं.

आपल्या नवऱ्याने एकदम हटके प्रपोज करावं अशी लीलाची इच्छा असते. जसं जिमी शेरगील रिषितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं…; लीलाचं म्हणणं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसं तुमचं प्रपोजलही युनिकच हवं. प्रेमात असंच असतं, इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात. तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं जिथे छान बर्फ असेल.

लीलाला बर्फात उभं राहून रोमँटिक डान्स करायचा आहे. एवढंच नव्हे तर तिला शिकारा राइड देखील करायची असते. लीलाच्या या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय. मालिकेचा हा विशेष भाग रिअल लोकेशन शूट केला जाणार आहे. यासाठी लीला ( वल्लरी विराज ), एजे ( राकेश बाप ) हे दोघंही काश्मीरला गेले होते.

काश्मीर येथील शूटबाबत वल्लरी विराजने आपला अनुभव सांगितला आहे. ती म्हणते, “आम्ही काश्मीरला गेलो होतो तिथे आम्ही ४ दिवस शूट केलं. आम्ही निसर्गमय, बर्फाच्या चादर ओढलेल्या श्रीनगर, गुलमर्ग अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही शूटिंग केलं. तिकडे शूटिंग करणं इतकं सोपं नव्हतं, कारण प्रचंड थंडी होती. पण, बर्फात शूट करायची मजा काही वेगळीच होती. आम्ही गुलमर्गला बर्फात एजे-लीलाचा प्रपोजल सीन शूट केला. गुलमर्गमध्ये बर्फात साडी नेसून एक गाणं देखील शूट केलं आहे. बर्फात साडी नेसून शूट करणं हा माझ्यासाठी एक मोठा टास्क होता. मला साडीत खूप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट होत होता मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होतं.

“खासकरून ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेची जी क्रिएटिव्ह आहे मनाली तिने माझी खूप काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापट ने ही मला खूप चांगलं समजून घेतलं. पण, जेव्हा मी तो सीन स्क्रीनवर पाहिला तेव्हा माझी उत्सुकता वाढत गेली. आम्ही दल लेकला शिकारामध्ये बसून सुद्धा शूट केलंय. तो सुद्धा एक छान अनुभव होता. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील.” असं वल्लरीने सांगितलं. दरम्यान, ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर दररोज रात्री १० वाजता प्रसारित केली जाते.

Story img Loader