Zee Marathi Serial Paaru & Savlyachi Janu Savali : ‘झी मराठी’च्या ‘पारू’ आणि ‘सावळ्याची जणू सावली’ या दोन मालिकांमध्ये अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नवीन ट्विस्ट येणार आहे. आता या दोन्ही मालिका नेमकं कोणतं वळण घेणार पाहुयात…
‘सावळ्याची जणू सावली’ या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकरने आजारपणामुळे काही दिवस शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. मात्र, आता ती पुन्हा एकदा सेटवर परतली आहे. आता सावली सासरी परतल्यामुळे तिच्या आणि सारंगच्या आयुष्यात गोड वळण येणार आहे. किचनमध्ये जेवण बनवणारी सावली विचार करण्यात मग्न असते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी नवरा-बायको एकमेकांना घास भरवतात असा विचार तिच्या डोक्यात सुरू असतो.
इतक्यात सारंग किचनमध्ये येतो आणि तिला म्हणतो, “तू आमरस बनवलास, मग स्वत: खाल्लास की नाही?” यावेळी, सावली किचनमध्ये काम करत असल्याने सारंग तिला स्वत:च्या हाताने घास भरवून निघून जातो. यामुळे सावलीची मोठी इच्छा पूर्ण होते. आता दोघांच्या नात्यात नकळत एक वेगळं वळण आल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
तर, दुसरीकडे ‘पारू’ मालिकेत आदित्य अन् पारूचं प्रेम दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. आदित्यने बायको म्हणून मान देऊन अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घास भरवल्याने पारू खूप आनंदी असते. पण, आता पारू-आदित्यच्या नात्याचं सत्य प्रियासमोर येणार आहे. प्रिया नेमकी पारू अन् आदित्यला एकमेकांना घास भरवताना पाहते यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. तिला या दोघांच्या नात्याची कल्पना नसल्याने खूप मोठा धक्का बसतो.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’ आणि ‘पारू’ या दोन मालिकांचे हे विशेष भाग येत्या अक्षय्य तृतीयेला प्रेक्षकांना अनुक्रमे संध्याकाळी सात (७) वाजता आणि साडेसात (७:३०) वाजता पाहायला मिळणार आहेत.
दरम्यान, नेटकरी हा प्रोमो पाहून आनंदी झाले आहेत. आता अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर पारू आणि सावलीच्या आयुष्याची गोड सुरुवात होणार की मालिकेतील खलनायक पुन्हा एकदा ट्विस्ट आणणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.