प्रेमळ, घरच्यांसाठी काहीही करायला तयार असणारी, कष्टाळू अशी ही सावली प्रेक्षकांची लाडकी आहे. ‘सावळ्याची जणू सावली'( Savalyachi Janu Savali) या मालिकेतील सावली व सारंग आता घराघरांत पोहोचले आहेत. त्यांच्या मर्जीशिवाय झालेले लग्न, एकमेकांबरोबर इच्छा नसताना करावा लागणारा संसार, सारंगचे अस्मीवर असलेले प्रेम, सावलीच्या रंगामुळे सारंगच्या घरात तिला मिळणारी दुय्यम वागणूक ते सावली-सारंगमध्ये हळूहळू फुलणारी मैत्री, असा हा प्रवास प्रेक्षकांना आवडत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये मालिकेत मोठा ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
सावळ्याची जणू सावली या मालिकेचा एक प्रोमो झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केला आहे. सावली तिच्या माहेरी आली आहे. सारंगही तिथे असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे. सावली-सारंगमध्ये संवाद सुरू आहे. सारंग सावलीला म्हणतो, “सावली सगळ्यांचा किती विचार करतेस. तू खरंच ग्रेट आहेस”, तो बोलत असताना सावलीला सारंगबरोबरचे आनंदी क्षण आठवताना दिसत आहेत. सारंग पुढे म्हणतो, “मला, आपल्या घराला तुझी सवय झाली आहे. तर घरी लवकर येशील का?” त्यानंतर सारंग निघून जातो.
याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, एक मुलगी जंगलातून पळत आहे. तिच्यामागे काही लोक पळत आहेत. पुढे ही मुलगी एका माणसाच्या हातातील मोबाईल घेऊन पळते. त्यानंतर ती कोणाबरोबर तरी बोलताना दिसत आहे. ती म्हणते, “मी आता बाहेर आली आहे. आता बदला घेणार”. त्यानंतर या मुलीचा चेहरा दिसतो. ही मुलगी दुसरी-तिसरी कोणी नसून, अस्मी आहे. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने ‘सारंग-सावलीच्या नात्याला लागणार का अस्मीची नजर?’, अशी कॅप्शन दिली आहे.
‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत दाखविल्याप्रमाणे सारंगच्या आईला तिलोत्तमाला सुंदर, गोऱ्या वर्णाचेच लोक आवडतात. त्यामुळे तिच्या मुलाची पत्नी सुंदर मुलगी असावी, अशी तिची इच्छा होती. मात्र, जगन्नाथने तिलोत्तमाचा बदला घेण्यासाठी आधी अस्मी नावाच्या मुलीला सारंगच्या आयुष्यात आणले. सारंग तिच्या प्रेमात पडला. त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. त्यानंतर जगन्नाथने तिला ऐन लग्नाच्या वेळी गायब केले आणि सावली व सारंगचे लग्न लावून दिले. सावली ही गरीब कुटुंबातील सावळ्या रंगाची आहे. त्यामुळे तिलोत्तमा व इतर काही जण तिला सारंगची पत्नी व घरची सून मानत नाहीत. सारंगलादेखील सुरुवातीला सावलीचा राग यायचा. मात्र, हळूहळू त्यांच्यात मैत्री झाल्याचे दिसत आहे. आता अस्मीच्या परतण्याने सारंग व सावली यांच्यातील मैत्री तुटणार का, मालिकेत पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, ‘सावळ्याची जणू सावली’मध्ये अस्मीची भूमिका अभिनेत्री स्नेहलता माघाडेने साकारली आहे.