Zee Marathi Serial Tula Japanar Ahe Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवर येत्या काही दिवसांत नवनवीन मालिका सुरू होणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वाहिनीवर ‘लक्ष्मी निवास’ ही कौटुंबिक मालिका सुरू करण्यात आली आहे. प्रेक्षकांचा सुद्धा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या पाठोपाठ आणखी एक मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ या कौटुंबिक मालिकेनंतर ‘तुला जपणार आहे’च्या रुपात वाहिनीवर एक थ्रिलर मालिका सुरू होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आई आपल्या लेकराच्या संरक्षणासाठी आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अग्निदिव्यांना सामोरी जाते. ‘तुला जपणार आहे’ या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये सुद्धा असंच काहीसं पाहायला मिळत आहे. आई-वडील आणि त्यांची लहान मुलगी यांच्या सुखी कुटुंबाला अचानक दृष्ट लागते आणि आईचं म्हणजेच मुख्य नायिकेचं निधन होतं. यानंतर मालिकेतली खलनायिका नायकाशी लग्नाचा घाट घालते. मात्र, तिला लहान मुलीविषयी कोणतीच आपुलकी नसते. दुसरीकडे, निधनानंतरही आपल्या लेकीच्या संरक्षणासाठी मुख्य नायिका देवीआईकडे प्रार्थना करत असल्याचं या मालिकेच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. म्हणूनच मालिकेची टॅगलाइन, ‘दिसत नसले तरी असणार आहे, मी तुला जपणार आहे…!’ अशी आहे.

‘झी मराठी’च्या नव्या मालिकेत झळकणार ‘हे’ कलाकार

आता स्वत:च्या मुलीच्या रक्षणासाठी आई कुठल्या अग्निदिव्यांना सामोरी जाणार हे मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यामध्ये आईची मुख्य भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर साकारणार आहे. तर, खलनायिकेच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड झळकणार आहे. यापूर्वी तिने ‘सोनी मराठी’च्या ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेत काम केलेलं आहे.

तसेच ‘तुला जपणार आहे’ या मालिकेत नीरज गोस्वामी प्रमुख अभिनेत्याची भूमिका साकारणार आहे. यापूर्वी त्याने ‘झी मराठी’वरच्या ‘सारं काही तिच्यासाठी’ मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. आता या नव्या मालिकेच्या निमित्ताने नीरजचं छोट्या पडद्यावर लगेचच पुनरागमन झालेलं आहे. याशिवाय महिमा म्हात्रे, मिलिंद पाठक, निलेश रानडे, शर्वरी लोहकरे, सिद्धीरुपा कर्माकर आणि बालकलाकार अधिकी कसबे अशी जबरदस्त स्टारकास्ट प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, ‘तुला जपणार आहे’ ही मालिका केव्हा सुरू होणार याची अधिकृत घोषणा वाहिनीकडून करण्यात आलेली नाही. लवकरच या मल्टीस्टारर मालिकेचा मुहूर्त सोहळा आणि प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात येईल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zee marathi serial tula japnar aahe new promo starring these actors watch now sva 00