Zee Marathi Icchadhari Naagin : ‘झी मराठी’ वाहिनीने दोन दिवसांपूर्वीच ‘देवमाणूस’ मालिकेची घोषणा केली. लोकप्रिय मालिका पुन्हा भेटीला येत असल्याने सध्या प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अशातच ‘झी मराठी’ने आणखी एका थ्रिलर मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित केला आहे.
‘झी मराठी’ने नोव्हेंबर महिन्यात ‘इच्छाधारी नागीण’ या मालिकेची घोषणा केली होती. हिंदी टेलिव्हिजन विश्वात ‘नागीण’ मालिकेला भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे ही मालिका मराठीत केव्हा भेटीला येणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आता ‘देवमाणूस’ पाठोपाठ ‘झी मराठी’ने ‘इच्छाधारी नागीण’चा जबरदस्त प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. मात्र, या मालिकेतील कलाकार अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहेत.
“गोष्ट आहे माणसांच्या जगापलीकडची, महादेवाची उपासना करणाऱ्या नागदेवतांची…ज्यांच्या नागमणीचा घेतला माणसाने ध्यास आणि स्वार्थापोटी केला त्यांचा विश्वासघात. तेव्हा नागकन्या सूडाने पेटली आणि बदल्यासाठी माणसांच्या जगात अवतरली. जिथे तिला प्रेम मिळालं, साथ मिळाली. पण, शेवटी खऱ्या चेहऱ्याची ओळख पटली. आता सूड आणि प्रेमाच्या या अजब खेळात काय निवडेल नागकन्या?” असं निवेदन करून ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आहे.
आता नागकन्या प्रेम निवडणार की सूड याचा उलगडा ही मालिका प्रेक्षकांसमोर आल्यावर होणार आहे. ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेतील जबरदस्त VFX ने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. नेटकऱ्यांनी देखील या मालिकेच्या प्रोमोवर कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.
दरम्यान, टीआरपीच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सध्या प्रत्येक मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका सुरू होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता ‘इच्छाधारी नागीण’ मध्ये नागकन्येची प्रमुख भूमिका कोण साकारणार? याबद्दल सर्वत्र चर्चा रंगली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये पूजा सावंत, तेजश्री प्रधान, हृता दुर्गुळे यांची नावं घेतली आहेत. आता ही प्रमुख भूमिका कोण साकारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
दरम्यान, ‘इच्छाधारी नागीण’ ही रहस्यमय आणि थ्रिलर मालिका असणार आहे. आता नव्या मालिकेची तारीख अन् वेळ जाहीर झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार याबाबत स्पष्टता येईल.