‘शिवा’ (Shiva) मालिकेत नवीन वळण आले असून प्रेक्षकांना सासू सुनेच्या जोडीची धमाल पाहायला मिळत आहे. सिताई व शिवा एकत्र येत प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. सिताईने शिवाला तिची सून म्हणून स्वीकारले आहे, तसेच सिताईने शिवाला जसं हवं तशी राहण्याची मुभाही दिली आहे. याबरोबरच देसाईंच्या घरात शिवाची ओळख जपली जाईल, असे म्हणत सिताईने बाई आजी व शिवाची आई वंदानालाही आश्वस्त केले आहे. आता या सगळ्यात देसाईंच्या घरात म्हणजेच शिवाच्या सासरी तिच्या जीवाला धोका असल्याचे समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसत आहे.

‘शिवा’ मालिकेत नेमकं काय घडणार?

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की कीर्ती व तिचा नवरा यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. कीर्ती म्हणते, “आपल्याला त्या शिवाचा निकाल लावायला हवा”, त्यावर तिचा नवरा विचारतो, “निकाल म्हणजे?” त्यावर कीर्ती म्हणते, “कायमचा निकाल.” या प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, शिवा किचनमध्ये गेली आहे, तिने फ्रीजमधून काहीतरी बाहेर काढले आहे, तेवढ्यात तिला दिसते की चालू गॅसवर कुकर आहे व तो हलत आहे. घरातील बाकी सगळे घराबाहेर गार्डनमध्ये बसले आहेत. त्यांना मोठा स्फोट झाल्याचा आवाज येतो. आशू शिवा अशी हाक मारत आत जातो. त्याच्यामागे सर्व जण जातात. तो शिवा शिवा म्हणत घरात जातो, तेव्हा त्याला किचनमध्ये कुकर फुटल्याचे दिसते.

हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने “देसाईंच्या घरात शिवाच्या जीवाला धोका?”, अशी कॅप्शन दिली आहे.

शिवा मालिकेत दाखविल्याप्रमाणे, शिवाची इतर मुलींपेक्षा राहण्याची, जगण्याची पद्धत वेगळी आहे. ती मुलांसारखी वेशभूषा करते, प्रसंगी ती मारामारीदेखील करते, त्यामुळे सिताई व कीर्ती यांना ती आशूची पत्नी म्हणून मान्य नव्हती, त्यामुळे घरात अनेकदा वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. कीर्तीच्या सांगण्यावरून सिताईने शिवाला घराबाहेर व आशूच्या आयुष्यातून बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्नही केले. आता मात्र सिताईने शिवाला तिची सून म्हणून स्वीकारले आहे. मात्र, कीर्तीला शिवा आवडत नाही, त्यामुळे ती शिवाविरुद्ध कारस्थान करताना दिसत आहे. आता मालिकेत पुढे काय होणार, कीर्ती शिवाला त्रास देण्यासाठी नेमके काय करणार, तसेच तिचे कारस्थान सर्वांसमोर येणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.