मालिकेतील विविध भूमिका लक्षात घेतल्या, तर नायक-नायिका जितके महत्त्वाचे असतात, तितकेच खलनायिका आणि खलनायकही महत्त्वाचे असतात. कारण- त्यांच्यामुळे कथेला एक वेगळे वळण मिळते. सततच्या ट्विस्टमुळे मालिकेतील प्रेक्षकांची उत्सुकता टिकून राहते. आता ‘शिवा'(Shiva) या मालिकेतील कीर्ती ही शिवाला सातत्याने त्रास देत असते. आशूची बहीण कीर्ती तिच्या नवऱ्यासह माहेरी राहते. तिला आशूची बायको शिवा आवडत नाही. शिवा त्यांच्या स्टेटसला शोभणारी नाही, असे तिला वाटते. कारण- शिवा ही श्रीमंत घरातली नाही. ती झोपडपट्टीत राहणारी एका गरीब कुटुंबातील तरुणी आहे. वडील गेल्यानंतर तिने जशी गॅरेजची जबाबदारी खांद्यावर घेतली, तशीच तिने घराचीही जबाबदारी सांभाळली. ती इतर मुलींप्रमाणे राहत नाही. तिचे केस मुलांप्रमाणे छोटे आहेत. ती मुलांप्रमाणेच वेशभूषादेखील करते. प्रसंगी मारामारीही करते. अशा सगळ्या कारणांमुळे कीर्तीला शिवा आवडत नाही.
या मालिकेत सुरुवातीपासूनच कीर्ती शिवाच्या विरोधात होती. त्यामुळे तिने अनेकदा शिवाला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकदा तिला जीवे मारण्याचाही कट रचला आहे. मात्र, प्रत्येक वेळी तिला अपयश आल्याचे पाहायला मिळाले. तिने तिची व आशूची आई सिताईलादेखील शिवाच्या विरोधात उभे राहायला प्रवृत्त केले होते. आशू व शिवाचा घटस्फोट करवून, आशूचे दुसरे लग्न लावून द्यावे यासाठी तिने सिताईला तयार केले होते; मात्र त्यातही तिला अपयश आले. विशेष बाब म्हणजे, आशू व शिवाच्या अगदी लग्नाच्या सुरुवातीपासून जी सिताई शिवाच्या विरोधात होती, जी तिला सून मानण्यास नकार देत होती. तिनेच आता शिवाला सून म्हणून, एवढेच नव्हे, तर तिच्या वेगळ्या ओळखीसह तिला स्वीकारले आहे. इतकेच नाही, तर शिवाप्रमाणे तिने काही गोष्टीही आत्मसात केल्या आहेत. शिवाला समजून घेण्यासाठी तिने तिच्याबरोबर वस्तीत जाऊन, त्या जीवनाचा अनुभव घेतला.
सिताई जशी गाडी चालवायला शिकली, शिट्टी वाजवायला शिकली. तसेच शिवाचे काही शब्दही सिताईने आत्मसात केले आहेत. आता सिताईला शिवाचे कौतुक वाटत आहे. या सगळ्याचा कीर्तीला राग येत असल्याचे पाहायला मिळत आहे. याआधी तिने कुकरचा स्फोट घडवून, शिवाला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर तिने पाडव्याच्या दिवशी शिवाच्या गाडीचे ब्रेक फेल केले. त्यानंतर सिताईने ती गाडी चालवण्यास मागितली. शिवाला कीर्तीच्या त्या कारस्थानाबद्दल माहीत नसल्याने तिनेदेखील ती गाडी सिताईला दिली. जेव्हा सिताईने गाडी चालवण्यास सुरुवात केली, तेव्हा सिताईला समजले की, बाइकचे ब्रेक लागत नाहीत. त्यानंतर शिवा जुगाड करीत त्या गाडीवर बसल्याचे पाहायला मिळाले. आता या मालिकेत मोठा ट्विस्ट आल्याचे समोर आलेल्या प्रोमोत पाहायला मिळत आहे.
आशू सुहासच्या सणसणीत कानाखाली देणार
झी मराठी वाहिनीने शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे की, कीर्ती व तिचा पती सुहास यांच्यामध्ये घडलेल्या प्रसंगाबद्दल बोलणे सुरू आहे. शिवा प्रत्येक वेळी कशी वाचते, ती वाईट आहे अशा आशयाचे हे बोलणे आहे. तितक्यात आशू त्यांच्या खोलीत येतो. तो रागात असल्याचे दिसते. तो रागात बॅग त्यांच्यासमोर ठेवतो. तेवढ्यात कीर्ती म्हणते, बॅग का काढतोयस तू? आशू त्यांना रागाने म्हणतो बॅग भरायला घ्या. कीर्ती त्याला म्हणते की, काय बोलत आहेस तू? आशू तिला म्हणतो की, बास झाली तुमची नाटकं. कीर्ती त्याला म्हणते कसली नाटकं? आशू सुहासकडे बघत विचारतो की, बाईकचे ब्रेक कोणी फेल केले? सुहास घाबरत म्हणतो की, मला काही माहीत नाही. त्यावर आशू त्याला सणसणीत कानाखाली मारताना दिसत आहे.
हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘कीर्ती, सुहासच्या कारस्थानांबद्दल आशूला कळणार’, अशी कॅप्शन दिली आहे.
शिवा मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी आशूचे कौतुक केले आहे. “शाबास आशू”, “कीर्तिबरोबर राहून आता त्या सुहासलासुद्धा त्याची सवय झाली आहे”, “आशू तुझा निर्णय एकदम बरोबर आहे”, अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत. आता मालिकेत पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.