‘शिवा’ (Shiva) ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. सततच्या नवीन ट्विस्टमुळे मालिकेत पुढे काय होणार, ही प्रेक्षकांची उत्सुकता कायम टिकून असते. गेल्या काही दिवसांपासून शिवा व सिताई एक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सिताईने शिवाला जसे आहे तसे स्वीकारले आहे. सिताई शिवाकडून अनेक नवीन गोष्टी शिकत आहे. तसेच कीर्तीने शिवाला त्रास दिल्याने सिताईने तिला शिक्षादेखील दिली आहे. कीर्ती शिक्षा तर भोगत आहेच; पण त्याचबरोबर ती शिवाविरुद्ध मोठा प्लॅनदेखील करीत आहे. ती शिवाच्या काकांना हाताशी धरून प्लॅन करीत असल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र, तो नेमका प्लॅन काय हे मात्र समोर आले नव्हते. त्याबरोबरच दिव्या सर्वांसमोर तिच्यामध्ये बदल झाले आहेत, असे खोट वागत आहे; मात्र तीदेखील काहीतरी मोठे करण्याची योजना बनवत असल्याचे दिसत होते. आता शिवा या मालिकेत नवीन ट्विस्ट येणार असल्याचे पाहायला मिळत आहे.

दिव्या विश्वासघात करणार…

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, दिव्याच्या हातात एक फाइल आहे. ती फाइल हातात घेते. त्यातील कागदपत्रे पाहत ती आनंदाने स्वत:शीच मोठ्याने म्हणते, “आता या घराची मालकीण दिव्या कैलास पाटील. पुढे पाहायला मिळते की, दिव्या ती कागदपत्रे घेऊन कीर्तीकडे गेली आहे. ती फाइल पाहून कीर्तीच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ती फाइल ती शिवाच्या जगदीशकाकांकडे देत म्हणते, हे शिवाच्या घराचे ओरिजनल पेपर्स.”

याच प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की, जगदीशकाका शिवाच्या घरात आहे. तो शिवाच्या वडिलांचा फोटो हातात घेतो आणि म्हणतो, “मी तुझ्या घरात व तू…”, असे म्हणून तो फोटो जगदीशकाका बाहेर फेकतो. पुढे तो म्हणतो, “आता मी या घराचा मालक जगदीश पाटील”, असे म्हणत तो विचित्र हसताना दिसत आहे. घडल्या प्रकारामुळे शिवाच्या चेहऱ्यावर दु:खाचे, तसेच संतापाचे भाव दिसत आहेत. शिवा निर्धार करीत म्हणते, “या घरावर आधीसुद्धा नाव कैलास पाटील होतं आणि यापुढेही कैलास पाटीलच राहणार. हा शिवा कैलास पाटीलचा शब्द आहे.”

शिवा मालिकेचा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, ‘जगदीशकाकाच्या तावडीतून शिवा सोडवू शकेल का तिचं घर?’, अशी कॅप्शन दिली आहे.

हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी जगदीशकाकाला धडा शिकवावा, असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “क्या बात है, महाएपिसोड बघायला मजा येणार आहे. आता तरी शिवाला कळायला पाहिजे की, या सगळ्यात दिव्या व कीर्तीचासुद्धा हात आहे.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “नुसतं काकाला नाही, तर स्वत:च्या बहिणीला आणि त्या कीर्तीला अजिबात सोडू नकोस. निदान यावेळी सत्य सर्वांसमोर आले पाहिजे. कृपया त्यांना पाठीशी घालू नकोस”. आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “जगदीशकाका आता तुझं काही खरं नाही. शिवा खूप चिडली आहे. कारण- आता प्रश्न फक्त तिच्या पप्पांचा किंवा घराचा नाही. तर तिच्या आई व आजीच्या आत्मसन्मानाचासुद्धा आहे. सर्वांत मूर्ख ती दिव्या आहे. आता फक्त त्या दिव्या व कीर्तीचं सत्य सर्वांसमोर यावं म्हणजे झालं”. एका नेटकऱ्याने लिहिले, “शिवा त्या जगदीशला सोडू नकोस, मार त्याला”. अशा कमेंट्स पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये शिवाला प्रेक्षकांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे.

दरम्यान, मालिकेत पुढे काय होणार, शिवासमोर दिव्या व कीर्तीचे सत्य येणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.