अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणारी, गुंडांबरोबर मारामारी करणारी, मुलांसारखा पेहराव करणारी, केस छोटे असलेली ही धाडसी ‘शिवा’ (Shiva) प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या शिवा मालिकेतील ही शिवा तिच्या या अनोख्या अंदाजामुळे प्रेक्षकांची लाडकी आहे. मात्र, तिचा हा अनोखा अंदाज तिच्या सासूला म्हणजेच सिताईला सुरुवातीला आवडला नव्हता. तिच्या सुनेबद्दलच्या कल्पना वेगळ्या होत्या, त्यामुळे घरात सातत्याने वाद होत असल्याचे पाहायला मिळाले. या सगळ्यात आशू-शिवा काही दिवस घरापासून वेगळेही राहिले. आता मात्र सिताईने शिवाला तिची सून म्हणून स्वीकारले आहे. सिताईने शिवाचा पुन्हा एकदा गृहप्रवेश केला आहे.

कीर्ती-दिव्याचा प्लॅन फसणार

सिताईने फक्त शिवाचा गृहप्रवेशच केला नाही, तर शिवाची स्टाईलही आपलीशी केली आहे. शिवासारखेच कपडे व तिच्यासारखीच स्टाईल सिताईने केल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच शिवाचे जग अनुभवण्यासाठी सिताई शिवाच्या वस्तीतही गेल्याचे दिसत आहे. मराठी सीरियल्स या इन्स्टाग्राम अकाउंटनुसार, शिवा मालिकेतील सिताई या नव्या अनुभवांचा आनंद घेत आहे, हे सगळं पाहून कीर्ती अस्वस्थ होते आणि शिवा-सिताईमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, सिताई तिला जोरात चापट मारते. आशु आणि शिवाच्या भांडणामागे दिव्याचा हात असल्याचे समोर येते. हे सत्य समोर येताच बाई आजी आणि वंदना संतापतात. बाई आजी दिव्याला घराबाहेर काढते.

अभिनेत्री मीरा वेलणकर यांनी त्यांच्या नवीन लूकबद्दल तसेच त्यांना मिळालेल्या संधीबद्दल त्यांचा अनुभव व्यक्त केला. मीरा वेलणकर म्हणाल्या, “गेले वर्षभर मी सिताईची भूमिका साकारत आहे, शिवाच्या विरोधात उभी राहणारी, तिचा स्वीकार न करणारी, तिच्या पेहरावावर टीका करणारी, पण आता मालिकेत अचानक एक ट्विस्ट येणार आहे. सिताई शिवाचा स्वीकार करणार आहे. तिचं खरं रूप समजून घेऊन सिताई एक प्रेमळ व्यक्ती, आई आणि सासू म्हणून शिवाच्या वेगळेपणाला आपलंस करणार आहे. आम्ही दोघी मिळून धमाल करणार आहोत. पारंपरिक पद्धतीने वावरणारी सिताई, शिवासारखी पँट आणि शर्टमध्ये दिसणार आहे. मला एक गोष्ट सांगायला आवडेल की, मी शिट्टी वाजवायला शिकणार आहे. जेव्हा मी ह्या लूकमध्ये तयार होऊन बाहेर पडले, तेव्हा येता-जाता सेटवरचे लोक थांबून मला बघत होते.”

“प्रेक्षकांना हा एक छान सुखद धक्का भेट मिळणार आहे. मी आणि शिवाने सेम शर्ट घातले आहे. नेहमी जेव्हा सीन्स होतात तेव्हा सर्व आपल्या कामात व्यस्त असतात, पण जेव्हा एन्ट्रीचा सीन शूट होत होता तेव्हा पूर्ण युनिट मॉनिटर स्क्रीनवर त्या सीनचा आनंद घेत होते. एक कलाकार म्हणून मला खूप आनंद झाला. असे सीन सारखे लिहिले जात नाहीत आणि मला ते शिवा मालिकेत साकारायला मिळाले, हे माझं भाग्य समजते. सिताईच्या हातातल्या हिरव्या बांगड्यांच्या जागी शिवासारखं कडं आणि लेदर बेल्ट घालून भाईसाब असं म्हणावसं वाटलं. पण, मला आठवलं की जरी मी कपडे शिवासारखे घातले आहेत, पण आतून मी सिताईच आहे; तर मस्ती करायची पण सिताईच्या पद्धतींने, अशी संधी आर्टिस्टला करायला मिळणे ही मोठी गोष्ट आहे आणि ही संधी मला मिळाली,” असे म्हणत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

दरम्यान, आता ‘शिवा’ मालिकेत नेमकं काय घडणार, सासू-सून मिळून काय धमाल करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबरोबरच, सिताई व शिवा एकत्र झालेल्या पाहून किर्ती व दिव्या पुढे काय करणार हे पाहणेदेखील उत्सुकतेचे आहे.