‘शिवा'(Shiva) ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचताना दिसत आहे. या मालिकेतील शिवा हे पात्र प्रेक्षकांचे विशेष लाडके आहे. त्यांच्या अनोख्या अंदाजात ती नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करते. प्रेक्षकांची मने जिंकून घेते. धाडसी, छोटे केस असलेली, वेळप्रसंगी मारामारी करणारी, स्वत:चे गॅरेज असणारी व त्यामध्ये काम करणारी, कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी नेहमी तत्पर असणारी, मुलांसारखी वेशभूषा करणारी ही शिवा प्रेक्षकांचे सतत लक्ष वेधून घेते. तिचे हे वेगळेपण प्रेक्षकांना भावताना दिसते. ‘केसाला धक्का, तर कपाळाला बुक्का’ हा तिचा डायलॉगही लोकप्रिय ठरला आहे.

शिवाचा हा धाडसी स्वभाव प्रेक्षकांच्या जरी पसंतीस पडत असला तरी मालिकेतील तिच्या सासूला म्हणजेच सिताईला शिवाचे हे वागणे म्हणजे गुंडगिरी वाटते, त्यामुळेच शिवा ही आशूसाठी योग्य नसल्याचे सिताईचे म्हणणे आहे. पहिल्यांदा जेव्हा अपघाताने शिवा व आशूचे लग्न झाले होते, तेव्हादेखील शिवाला स्वीकारण्यास सिताईने नकार दिला होता. त्यानंतर जेव्हा आशूला त्याच्या प्रेमाची जाणीव झाली आणि त्याने शिवाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, तेव्हादेखील सिताईने शिवाला स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर आशूने शिवासह ते घर सोडले व तो वेगळीकडे राहू लागला. मात्र, काही दिवसांपूर्वीच सिताईने शिवाला घरात राहण्यास परवानगी दिल्याने शिवा-आशू दोघेही परत घरी आले आहे. सिताई शिवाने मारामारी सोडली पाहिजे, असे तिला समजावण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले. आता मात्र समोर आलेल्या प्रोमोमध्ये सिताईच शिवासारखी मारामारी करणार असल्याचे दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शिवा मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये पाहायला मिळते की काही गुंड सिताई आणि राम भाऊ यांना किडनॅप करतात. एका ठिकाणी नेऊन त्यांना दोरीने बांधतात. तितक्यात शिवा बुलेटवरून येते. आशूदेखील तिच्याबरोबर असल्याचे दिसते. शिवा गुंडांबरोबर मारामारी करते. त्यातील एक जण सिताईजवळ जातो, त्याला सिताई पायाने ढकलते, हे पाहताच शिवाला आनंद होतो. ती आय लव्ह यू सिताई असे म्हणते. त्यानंतर ती सिताईकडे जाते आणि तिला सोडवते. शिवा सिताईला म्हणते, सिताई मला तुमची साथ लागेल. त्यानंतर त्या दोघी मिळून गुंडांना मारताना दिसत आहेत. हा प्रोमो शेअर करताना झी मराठी वाहिनीने, “सिताई दुर्गाचं रुप घेणार, अखेर शिवाचा स्वीकार करणार”, अशी कॅप्शन दिली आहे.

नेटकरी काय म्हणाले?

शिवा मालिकेचा हा प्रोमो पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे. अनेक दिवसांपासून प्रेक्षक याची वाट पाहत असल्याचे चाहत्यांनी कमेंट करीत कौतुक केले आहे. “वाह! शिवा रॉक”, “सून एक नंबरी सासूबाई दहा नंबरी”, “प्रेक्षकांना हेच हवे होते”, “अखेरीस ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण”, “एक नंबर”, “मस्त”, “हा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक आहे”, “वाह”, अशा अनेक कमेंट्ससह प्रेक्षकांनी इमोजी शेअर करत कौतुक केले आहे.

दरम्यान, आता मालिकेत काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Story img Loader