झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ हा कार्यक्रम छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध कार्यक्रमांपैकी एक आहे. या कार्यक्रमामध्ये कलाक्षेत्रासह राजकीय क्षेत्रामधील मंडळीही हजेरी लावताना दिसतात. या कार्यक्रमाच्या नव्या भागामध्ये माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत तसेच चित्रपटांमध्ये केलेल्या कामाबाबत खुलासा केला. तसेच सगळ्या प्रश्नांची त्यांनी दिलखुलास उत्तर दिलं.
“आम्ही अनेकवेळा ऐकलं आहे तसेच मंचावरही पाहिलं आहे की सरांमध्ये एक अभिनेता दडलेला आहे. सरांनी काही चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. तर अभिनयक्षेत्रामध्ये सुरुवात कशी झाली? त्यानंतर एकदम राजकारणामध्ये तुम्ही कसे आलात?” असा प्रश्न निलेश साबळे याने छगन भुजबळ यांना विचारला.
यावेळी ते म्हणाले, “१९८२मध्ये माझा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याचं नाव होतं ‘दैवत’ या चित्रपटामध्ये रंजना, अशोक सराफ, अरुण सरनाईक असे उत्तम कलाकार या चित्रपटामध्ये होते. ‘मेट्रो’ चित्रपटगृहामध्ये या चित्रपटाचा पहिला प्रीमियर शो झाला. हा चित्रपट दिल्लीच्या विधानभवनामध्ये खासदारांना संसदेतर्फे दाखवण्यात आला. अटल बिहारी वाजपेयी, यशवंतराव चव्हाण अशा अनेकांनी हा चित्रपट पाहिला. आई व नेत्रदानावर हा चित्रपट आधारित होता.”
“नितीश भारद्वाजही या चित्रपटामध्ये होते. या चित्रपटामध्ये त्यांना कोणीतरी पाहिलं आणि ‘महाभारत’ मालिका त्यांना मिळाली. असे थोडेफार चित्रपट केले. अभिनयाची आवड तर खूप होती. पण नंतर राजकारणामध्ये प्रवेश केला. त्यानंतर रोजचंच नवीन नाटक आणि रोजचाच नवा सिनेमा. आमच्या राजकारण्यांचं नेहमी नवनवीन नाटक सुरूच असतं. तुम्हाला बातम्या आणि तुमच्या विनोदाला विषय फक्त आम्हीच पुरवतो. आम्ही सगळ्यांची फुकट करमणूक करत असतो.” छगन भुजबळ यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.