‘झी मराठी’ वाहिनी ही मनोरंजन क्षेत्रातील अग्रगण्य वाहिनी म्हणून ओळखली जाते. दर्जेदार मालिका, विनोदी कार्यक्रम आणि रिअॅलिटी शो यामुळे प्रेक्षकही ही वाहिनी सातत्याने पाहताना दिसतात. पण ‘झी मराठी’ वाहिनीचे सोशल मीडिया अकाऊंटवरील काही पोस्ट या उलट दिसत असल्याने ते चर्चेत आले आहे. यावरुन नेटकऱ्यांनी वाहिनीला ट्रोलही केले होते. अखेर आता या मागचे कारण समोर आले आहे.
नेमकं प्रकरण काय?
‘झी मराठी’ ही वाहिनी इन्स्टाग्राम, ट्वीटर, फेसबुक यासह सर्वच सोशल मीडियावर फारच सक्रीय असते. रविवारी (२६ फेब्रुवारी) दुपारी अचानक ‘झी मराठी’ वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील काही पोस्ट या उलट दिसत होत्या. त्यांनी त्यांच्या मालिकेचे काही प्रोमो व्हिडीओ शेअर केले होते. पण हे प्रोमो व्हिडीओ आणि त्यावरील कॅप्शन हे उलट दिसत होते. सुरुवातीला हा प्रकार नेमका काय? याबद्दल चर्चा सुरु झाली.
यावरुन अनेक नेटकऱ्यांनी वाहिनीला ट्रोल करण्यासही सुरुवात केली. यावेळी एकाने लिहिले की, “सर्व काही उलटे का आहे?” तर दुसऱ्याने लिहिले आहे “टीआरपीसाठी ‘झी मराठी’ सिरीयलची वेळ पण आता उलटी सांगणार का?” तर तिसऱ्याने लिहले आहे “यांनी मुद्दाम केले असणार.” अशा असंख्य कमेंट या वाहिनीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहायला मिळाल्या.
आणखी वाचा : “TRP साठी आता…” सोशल मीडियावरील उलट्या पोस्टमुळे झी मराठी वाहिनी ट्रोल
नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला
यानंतर तासाभरापूर्वी ‘झी मराठी’ वाहिनीने या उलट दिसणाऱ्या पोस्टमागे नेमकं काय कारण आहे? याबद्दल सांगितले आहे. ‘झी मराठी’वरील या उलट दिसणाऱ्या पोस्टमागे त्यांची नवी मालिका असल्याचे समोर आले आहे. याचा प्रोमोही ‘झी मराठी’ने शेअर केला आहे.
या प्रोमोत बाप-लेक हे वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. त्याच वेळी अचानक जमिनीच्या आतून काहीतरी आवाज येत असल्याचे जाणवतं. यानंतर ती मुलगी तिकडे पाहते आणि जमिनीला कान लावून नेमका कसला आवाज येतोय ते पाहताना दिसते. त्यानंतर ती घाबरुन तिच्या वडिलांजवळ जाते, असे यात दाखवण्यात आले आहे.
आणखी वाचा : “वैभव तत्त्ववादी माझा…” प्राजक्ता माळीने उघड केले मोठे गुपित
“गूढ अंधारमय जगाची उलटी वाट, थरकाप उडवणार भीतीची लाट… ‘चंद्रविलास’ २७ मार्चपासून सोम-शनि रात्री ११ वाजता झी मराठी वर”, असे कॅप्शन ‘झी मराठी’ने या प्रोमोला दिले आहे. चंद्रविलास असे या मालिकेचे नाव आहे. या मालिकेच्या प्रोमोवरुन ही हॉरर मालिका असल्याचे स्पष्ट होत आहे. या मालिकेत अभिनेता वैभव मांगले झळकणार आहे. येत्या २७ मार्चपासून प्रेक्षकांना ही मालिका पाहता येणार आहे.