छोट्या पडद्यावरील मराठी मालिकांची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवली जाते. गेल्या काही दिवसांपासून वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत चढाओढ चालू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी वाहिन्यांकडून विविध प्रयत्न केले जातात. अनेक मालिकांमध्ये महासंगम घडवून आणले जातात, नव्या कलाकारांच्या एन्ट्री तर, टीआरपी कमी झालेल्या मालिकांची एक तर वेळ बदलली जाते किंवा त्या ऑफ एअर करण्यात येतात. आता येत्या काही दिवसांत ‘झी मराठी’ वाहिनीवर नवनवीन मालिका सुरू होणार आहे. यामुळे काही जुन्या मालिका ऑफ एअर होतील अशी चर्चा होती. अशातच एका लोकप्रिय मालिकेच्या मुख्य अभिनेत्याने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘झी मराठी’ वाहिनीवर ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका २२ ऑगस्ट २०२२ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेने तब्बल अडीच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अनेकदा या मालिकेच्या वेळा बदलण्यात आल्या. मात्र, तरीही ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षकांचं सुरुवातीपासूनच भरभरून प्रेम मिळालं. या मालिकेच्या टीआरपीत चिमुकल्या ‘सिंबा’च्या म्हणजेच साईराज केंद्रेच्या एन्ट्रीनंतर चांगली वाढ झाली. शिवानी नाईक ( अप्पी – अपर्णा माने ) आणि रोहित परशुराम ( अर्जुन कदम ) हे कलाकार मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत.

सध्या अर्जुनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता रोहित परशुरामने लिहिलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आली आहे. या पोस्टमुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल किंवा रोहित मालिकेतून एक्झिट घेईल अशा दोन शक्यता वर्तवण्यात येत आहेत. पण, सध्याचा मालिकेतील ट्रॅक पाहता ‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका ऑफ एअर होईल असा अंदाज नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये बांधला आहे.

‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेतील सुरुवातीपासूनचा संपूर्ण प्रवास एका व्हिडीओच्या माध्यमातून रोहितने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. “ए आरज्या ( अर्जुन – मालिकेतील नाव ), तुला न्याय देण्याचा जीव ओतून प्रयत्न केला रे मी… भेटू परत कधीतरी…आसगावात!” असं कॅप्शन अभिनेत्याने या व्हिडीओला दिलं आहे. यावरून नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये मालिका बंद होणार का? असे प्रश्न अभिनेत्याला विचारले आहेत.

“१०० टक्के… तू न्याय दिलास अर्जुन या भूमिकेला… मला स्वप्नील दादा म्हणून कायम तुझ्या बरोबर केलेले सीन आठवणीत राहतील”, “संपणार आहे का मालिका?”, “मालिका संपणार आहे की, तुमची मालिकेतील भूमिका संपली? काय आहे नक्की?”, “मालिका कधी बंद होऊ नये असं वाटत होतं खूप जास्त मिस करणार आहे”, “मालिका संपेल ना” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी अभिनेत्याच्या पोस्टवर दिल्या आहेत.