छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये टीआरपीसाठी नेहमीच चढाओढ सुरू असते. त्यामुळे चॅनेलकडून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी विविध प्रयोग केले जातात. टीआरपीच्या यादीत स्थान घसरलं की, निर्माते मालिकांमध्ये विविध ट्विस्ट आणून मालिका आणखी रंजक बनवण्याचा प्रयत्न करतात. अनेक वर्षे झी मराठी वाहिनी टीआरपीच्या शर्यतीत पुढे होती. परंतु, गेल्या वर्षभरात वाहिनीचं टीआरपीमधील स्थान घसरलं आहे. त्यामुळे वाहिनीवर काही महिन्यांपासून महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
डिसेंबर महिन्यात ‘झी मराठी’वरच्या ‘३६ गुणी जोडी’ व ‘नवा गडी नवं राज्य’ या दोन मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. परंतु, आता या लोकप्रिय मालिकांपाठोपाठ आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. ‘तू चालं पुढं’ या मालिकेतील अभिनेत्री धनश्री काडगावकरच्या इन्स्टाग्राम स्टोरीने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा : ‘दादा एक गुड न्यूज आहे’ फेम अभिनेता अडकणार विवाहबंधनात, मेहंदी सोहळ्यातील फोटोंवर ऋता दुर्गुळेची खास कमेंट
‘तू चालं पुढं’ या मालिकेत धनश्री शिल्पी हे पात्र साकारत आहे. सेटवरचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने त्याला “शूटिंगचे शेवटचे काही दिवस” असं कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे धनश्रीची इन्स्टा स्टोरी पाहून सर्वत्र ‘तू चालं पुढं’ मालिका बंद होतेय का याबद्दल चर्चा रंगल्या आहेत.
दरम्यान, ‘तू चालं पुढं’ या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये दीपा परब-चौधरी, धनश्री काडगावकर, आदित्य वैद्य या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. ही मालिका सोमवार ते शनिवार दररोज ७ वाजता प्रसारित केली जाते.